वडापाव नव्हे, रोजगार देणार!

वडापाव नव्हे, रोजगार देणार!

Published on

वडापाव नव्हे, रोजगार देणार!
मुख्यमंत्री फडणवीस यांचा ठाकरेंवर प्रहार
मुंबई, ता. १२ ः ‘शिवसेनेने मराठी मुलांना फक्त वडापावच्या गाड्या दिल्या. आम्ही त्यांना उद्योग आणि रोजगारही देऊ. उद्योजकांची गुंतवणूक नाकारली तर आपल्याच मुलांना रोजगार मिळणार नाहीत. तरुणांच्या नोकऱ्यांसाठी आम्ही उद्योजकांचे स्वागत करू; मात्र कोणालाही झुकते माप देणार नाही. अटकेपार झेंडे लावणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राकडे कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवाजी पार्कवर युतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत अत्यंत आक्रमकपणे ठाकरे बंधूंवर प्रहार केला.
‘काल आदित्य ठाकरे यांनी आपली नक्कल केली; मात्र इतकी वर्षे लोकांच्या नकला करणाऱ्या तुमच्या काकांच्या पक्षाची आज काय अवस्था आहे, ते बघा आणि आता तुमची आणि तुमच्या पक्षाची पुढे काय अवस्था होईल, याचाही विचार करा,’ असा टोला त्यांनी आदित्य यांना लगावला. विकासावर मला चर्चेचे आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरेंसाठी माहीमच्या उमेदवार, मुंबई भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई पुरेशा आहेत. ठाकरे यांनी उद्या त्यांच्याशी चर्चा करावी, अशा शब्दांत त्यांनी आदित्य यांची खिल्ली उडविली. फडणवीस यांनी या वेळी अत्यंत आक्रमकपणे, मराठी माणूस आणि महाराष्ट्र व मुंबईच्या हिताचा मुद्दा पुढे करून कालच्या ‘मविआ’च्या सभेतील मुद्द्यांना जोरकस प्रतिउत्तर दिले. ‘विकासावर बोलायचे तर मर्द असावे लागते. कुणाच्या मर्दानगीबाबत मी बोलणार नाही, ते माझे संस्कार नाहीत; पण तुम्ही माझ्या आई-बाबांवरदेखील घसरला होतात. आज माझे वडील स्वर्गातून बघतील तर त्यांना आपल्या मुलाने हिंदुत्वाचा वारसा चालविल्याचे पाहून अभिमान वाटेल; पण तुमचे वडील स्वर्गातून खाली बघतील तेव्हा त्यांना आपला मुलगा रशीद मामू यांच्या शेजारी बसलेला दिसेल,’ असा तुफानी प्रतिहल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढविला.

‘चुल्लूभर पानी मे डूब मरो’
‘पंचवीस वर्षे तुमची पालिकेत सत्ता होती तरी मराठी माणूस आज अडचणीत असल्याचे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही ‘चुल्लूभर पानी मे डूब मरो’’ अशी टीका फडणवीस यांनी केली. सारी कामे अदाणी यांना दिली जात असल्याच्या ठाकरे बंधूंच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. काँग्रेस, कम्युनिस्ट, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमुल काँग्रेस अशा भाजपेतर पक्षांच्या राज्यांमध्ये अदाणी यांनी केलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आकडेही त्यांनी दिले. अदाणींची संपत्ती मोदींमुळे वाढली, हा आरोप खोडून काढताना फडणवीस यांनी टाटा, एचडीएफसी, सन फार्मा, गोदरेज, डी मार्ट, आदित्य बिर्ला, आयसीआयसीआय बँक या सर्वांचा महसूल गेल्या १२ वर्षांत तीनशे ते पंधराशे टक्के वाढल्याचा दाखला दिला.
---
हिंदीसक्ती ठाकरेंचीच!
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या माशेलकर समितीने केल्याचे फडणवीस यांनी दाखवून दिले. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळ धोक्यात आल्याच्या ठाकरे बंधूंच्या आरोपाबाबत बोलताना, ‘राज ठाकरे हे कृष्णकुंजवरून शिवतीर्थावर गेले. उद्धव हे मातोश्री एकवरून मातोश्री दोनवर गेले,’ अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली. ‘नवी मुंबई विमानतळाची संकल्पना १९८८ मधील होती. मुंबई विमानतळाला मर्यादा आल्याने नवी मुंबई विमानतळ अत्यावश्यक होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता दीड पट वाढवू,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
---------
वेगळे होताना महाराष्ट्रहित नव्हते का?
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला
मुंबई, ता. १२ : ‘महाराष्ट्र हितासाठी आम्ही एकत्र आलो, असे आता ठाकरे बंधू सांगतात. मग २० वर्षांपूर्वी वेगळे होताना महाराष्ट्रहित दिसले नव्हते का,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत ठाकरे बंधूंना टोला लगावला.
‘मुंबईतील मराठी माणसांचे अस्तित्व कधीही धोक्यात नव्हते, आताही धोक्यात नाही आणि केव्हाही धोक्यात राहणार नाही. मराठी माणसांचे हित जपायला आम्ही समर्थ आहोत. मुंबईतील मराठी माणसांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. फक्त तुमचे राजकारण धोक्यात आले आहे,’ अशी टीका शिंदे यांनी केली. ‘मुंबईकरांना घरे, रोजगार, मूलभूत सुविधा देणे हे आमचे मिशन असून मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत मुंबईत आणणे, हा आमचा संकल्प आहे,’ असेही शिंदे यांनी ठामपणे सांगितले. ‘ठाकरे यांची शिवसेना विकासविरोधी असून त्यांचे पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यामुळे मराठी माणसाने त्यांच्यापासून सावध राहावे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावाचे नगरसेवक फोडले तेव्हा किती दक्षिणा दिली ते आधी सांगावे; मात्र आम्ही पक्ष सोडताना मंत्रिपदावर पाणी सोडले होते,’ असेही शिंदे म्हणाले.
---
आम्ही मुंबई तोडणारे नव्हे, जोडणारे
‘मुंबईला वेगवेगळ्या प्रकारे कमी कनेक्टिव्हिटी देऊन आम्ही मुंबई जोडणार आहोत. आम्ही मुंबई तोडणारे नाही. पालघरला ७६ हजार कोटींचे वाढवण बंदर येत आहे. नवे प्रकल्प महाराष्ट्रात येतात, तेव्हा ठाकरे बंधूंना खुपते. प्रकल्प महाराष्ट्रात आले तर मुंबई तोडण्याचा डाव आहे, असा आरोप ते करतात. प्रकल्प आले नाहीत तर प्रकल्प पळवले, असे म्हणतात; उलट महायुती सरकारमुळे राज्य औद्योगिक क्षेत्रात पुन्हा देशात पहिल्या क्रमांकावर आले. आता मुंबई फर्स्ट आणि मुंबईकर फर्स्ट ही आमची भूमिका आहे. मुंबईकर भूलथापांना आणि खोट्या प्रचारांना बळी पडणार नाही,’ अशा शब्दात शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com