पान ३ पट्टा

पान ३ पट्टा

Published on

भूमीचा वापर औषधी वनस्पतीसाठी

तारापूर (बातमीदार) : भूदानातून प्राप्त झालेल्या भूमीचा वापर औषधी वनस्पतीच्या विकासासाठी केला जाईल, तसेच परिसरातील शेतकऱ्यांना याविषयीचे ज्ञान, तंत्रज्ञान देण्यासाठी एक दालन उघडण्यात येईल असे प्रतिपादन सोमवंशी क्षत्रिय समाज संघ तारापूरच्या अध्यक्षा मनीषा सावे यांनी केले. तारापूर येथील शेतकरी रविकांत वासुदेव सावे आणि प्रभाकर वासुदेव सावे यांच्याकडून देणगी स्वरूपात प्राप्त झालेल्या भूमीवरील नामकरण समारंभ तसेच देणगीदार रामचंद्र हिराजी सावे जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा तारापूर येथे झाला. या कार्यक्रमात मनीषा सावे यांनी ही माहिती दिली. १०७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सोमवंशी क्षत्रिय समाज संघाने तारापूर परिसरातील नागरिकांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. रवीकांत सावे, प्रभाकर सावे यांच्या कुटुंबीयांनी संघाला दिलेल्या दीड एकर जमिनीतून संघ एक चांगला उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विचार करीत आहे.

-------------------------------
राजमाता जिजाऊ जयंती साजरी

तारापूर (बातमीदार) : सकल मराठा समाज बोईसर व शिवप्रेमी यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदवला व यशस्वीपणे आयोजन केले. राजमाता जिजाऊ चौकांमध्ये महिलांनी अतिशय सुंदर रांगोळी काढली. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेसमोर फुलांची सजावट करण्यात आली, त्यानंतर प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. राजमाता जिजाऊ यांचे कार्य व त्यांच्या जीवनपटावर उषा गायकवाड आणि रेवती मराठे यांनी आपले मनोगते व्यक्त केले. राजमाता जिजाऊ यांची शिकवण दैनंदिन जीवनात अमलात आणली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
--------------------------------
दाभोण पिलेनापाडा शाळेचे सुयश

वाणगाव (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दाभोण पिलेनापाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन अशा अनेक स्पर्धांमध्ये नैपुण्य यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वैज्ञानिक प्रकल्पाची तालुका स्तरावरून जिल्हास्तरावर निवड झाली. त्यात वैज्ञानिक कथाकथन स्पर्धेत वैशाली वावरेने द्वितीय क्रमांक पटकवला. केंद्र, विभागस्तरावर विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम, तर तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला. उपक्रमांसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा क्षीरसागर-कदम यांनी मार्गदर्शन केले, तर प्रतिभा क्षीरसागर यांची देखील शासनाच्या मुंबई विभागस्तरीय वादविवाद स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली असून त्यांच्या तालुकास्तरावरील वैज्ञानिक शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. याशिवाय शाळेतील क्रीडाशिक्षक चंदु करमोडा व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बारकू दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
--------------------------------------------
क्रिकेटच्या महासंग्रामाचे उद्घाटन

वाणगाव (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ असून, गावपातळीवर ''क्रिकेटचा महासंग्राम'' नियमितपणे पाहायला मिळतो. भातकापणीनंतर तरुणांना क्रिकेटचे वेध लागतात आणि गावपातळीवर सामने रंगतात, ज्यामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळते. यातून समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. भातकापणीनंतर आणि सुट्टीच्या दिवसांत विविध टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. समाजातील तरुण क्रिकेट क्षेत्रात आंतराष्ट्रीय पातळीवर निश्चित चमकतील. क्रिडाक्षेत्रा बरोबरच समाजामधे दहा हजार उद्योजक पुढील काळात निर्माण व्हायला हवेत. या करिता सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करू, असे बोईसर जवळील पाचमार्ग येथे आयोजित सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ, पडघे गटाच्या क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन कार्यक्रमात शिक्षण महर्षी मिलिंद पाटील बोलत होते. सुर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळ, पडघे गटाच्या क्रिकेटच्या महासंग्रामासाठी शिक्षण महर्षी मिलिंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com