सत्तासमीकरणांची कसोटी
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १३ : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत यंदा केवळ नगरसेवक निवडायचे नाहीत, तर भविष्यातील सत्तासमीकरणांची दिशा ठरवायची आहे. राज्यात सत्तेत असलेले शिवसेना आणि भाजप थेट एकमेकांसमोर उभे ठाकले असले, तरी ही लढत निवडणुकीपुरतीच मर्यादित राहणार की निकालानंतर पुन्हा सोयीची युती आकाराला येणार, हा खरा कळीचा प्रश्न आहे. दोस्ती का गठबंधन, फोडाफोडी, बंडखोरी आणि आकड्यांचे राजकारण यामुळे ही निवडणूक उल्हासनगरच्या इतिहासातील सर्वाधिक गुंतागुंतीची आणि निर्णायक ठरत आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूक रणांगणात यंदा शिवसेना विरुद्ध भाजप हीच मुख्य लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप स्वबळावर सर्व ७८ जागांवर निवडणूक लढवत असताना, शिवसेनेने टीओके, साई पक्ष आणि आरपीआय आठवले गट यांना सोबत घेत ‘दोस्ती का गठबंधन’ अधिक मजबूत केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आत्मविश्वास दिसून येत असला, तरी उल्हासनगरच्या राजकारणाचा इतिहास पाहता निकालानंतर चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०१७ नंतरचे राजकीय वळण
२०१७च्या महापालिका निवडणुकीनंतर भाजप, शिवसेना आणि टीओके या तीनही पक्षांनी एकमेकांना शह-काटशह देत पाच वर्षे सत्ता उपभोगली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत टीओके गटाला संधी न दिल्याने भाजप-टीओके संबंध तुटले आणि त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेचा महापौर महापालिकेवर विराजमान झाला. याच बंडखोरीतून पुढे लोकसभा निवडणुकीत दोस्ती का गठबंधन उदयास आले.
फोडाफोडीने तापलेले राजकारण
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये अधिकाधिक गट आपल्या बाजूला खेचण्याची चढाओढ सुरू झाली. यातूनच शिवसेनेने भाजपच्या पहिल्या फळीतील सहा ज्येष्ठ नगरसेवकांना आपल्या गळाला लावत भाजपला मोठा राजकीय धक्का दिला. याचे पडसाद राज्य पातळीवर उमटले आणि शिवसेना-भाजप युतीची शक्यता पूर्णतः मावळली.
युती आणि जागावाटपाचे गणित
शिंदे शिवसेनेसोबत टीओके, साई पक्ष आणि आरपीआय आठवले गट असे चार पक्ष एकत्र आल्याने ७८ जागांचे जागावाटप करणे ही मोठी कसरत ठरली. त्यामुळे शिवसेना-भाजप युती शक्यच नव्हती. दुसरीकडे भाजपने शिवसेना व टीओकेत गेलेल्या नेत्यांची पोकळी भरून काढण्यासाठी ठाकरे गटाच्या धनंजय बोडारे आणि राजेश वानखेडे या दोन बड्या चेहऱ्यांना पक्षात प्रवेश दिला.
उमेदवारी अर्जांचा विक्रमी पूर
उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वच पक्षांत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. अनेक निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्याने काहींनी विरोधी पक्षात प्रवेश केला, तर अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी तब्बल ७०२ अर्ज दाखल झाले होते. माघार आणि अवैध अर्जांनंतर ४३२ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. मात्र, अद्यापही अनेक बंडखोर मैदानात असल्याने पक्षनेतृत्वाची डोकेदुखी कायम आहे.
पक्षनिहाय निवडणूक चित्र
शिवसेना गट – एकूण ७८ जागा
शिवसेना (शिंदे) - ३५
टीओके - ३२
आरपीआय आठवले गट – ४ (धनुष्यबाण चिन्हावर)
साई पक्ष – ७
------
भाजप - सर्व ७८ जागांवर उमेदवार
--
मविआ
काँग्रेस - ३२
ठाकरे गट - ४४
मनसे - ११
राष्ट्रवादी (अजित पवार) – ३२
१६ जानेवारीला निकाल
उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत होत आहे. भाजप स्वबळावर सत्ता काबीज करते का, की शिवसेना-टीओके-दोस्ती का गठबंधन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरते, हे १६ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

