भाजप नेते अन्नामलाई यांच्या वक्तव्याविरोधात बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजप नेते अन्नामलाई यांच्या वक्तव्याविरोधात बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Published on

अन्नामलाई यांच्या वक्तव्याविरोधात बांगूरनगर पोलिस ठाण्यात तक्रार
मालाड, ता. १३ (बातमीदार) : तमिळनाडूतील भारतीय जनता पार्टीचे नेते अन्नामलाई यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात बांगूरनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. असे वक्तव्य करून त्यांनी मुंबई, महाराष्ट्र तसेच मुंबईसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, १० जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचारादरम्यान एव्हरशाइन नगर, मालाड (पश्चिम) येथे झालेल्या सभेत अन्नामलाई यांनी हे वक्तव्य केले. मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, असे विधान म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असून, ‘मुंबई’ऐवजी ‘बॉम्बे’ असा उल्लेख करून मराठी अस्मिता व महाराष्ट्राच्या अभिजात मराठी भाषेचा अपमान करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वकील सुभाष पगारे यांनी तक्रार दाखल केली असून, उच्च न्यायालयाचे वकील सुशींदर कुमार मुत्तूस्वामी यांनी कायदेशीर बाजू मांडली आहे. संबंधित वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये अन्नामलाई यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तत्काळ गुन्हा दाखल न झाल्यास बांगूरनगर पोलिस ठाण्यासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com