मतपेटीच्या गदारोळात निसर्गाची आर्त साद
मतपेटीच्या गदारोळात निसर्गाची आर्त साद
‘निसर्गाचे मत’ व्हिडिओतून पर्यावरण, आरोग्य आणि उद्याच्या जगासाठी संदेश
टिटवाळा, ता. १३ (वार्ताहर) : निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना घोषणा, आश्वासने आणि आरोप-प्रत्यारोपांच्या गर्दीत एक वेगळाच, पण महत्त्वाचा विषय समोर आला आहे. हा कोणत्याही व्यासपीठावरील भाषणाचा नसून निसर्गाचा आहे. योगदान फाउंडेशन ट्रस्टतर्फे ‘निसर्गाचं मत’ हा सामाजिक जनजागृती करणारा व्हिडिओ सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
या व्हिडिओची मांडणी निसर्गालाही मतदानाचा अधिकार असता, तर त्याने नेमके काय सांगितले असते? या एका प्रश्नाभोवती गुंफलेली संकल्पना आहे. झाडे, नद्या, पक्षी, प्राणी, हवा, माती आणि पृथ्वी यांना जणू मतदारांचा दर्जा देत झालेल्या हानीचे वास्तव परिणामकारक पद्धतीने मांडले आहे.
धुराने भरलेली हवा, वाहतूक कोंडीत अडकलेली शहरे, दूषित नद्या, झपाट्याने नष्ट होत असलेली हिरवळ आणि त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर कसे होतात, याचे वास्तव दाखवले आहे. या व्हिडिओत आरोग्य आणि पर्यावरण यांचा असलेला अतूट संबंध समोर येतो. तसेच, उद्याची हवा श्वास घेण्यायोग्य राहील का, पाणी पिण्यायोग्य असेल का आणि पुढील पिढ्यांना आरोग्यदायी जीवन मिळेल का? हा मूलभूत प्रश्न प्रत्येक मतदाराने स्वतःला विचारावा, असा संदेश यातून दिला आहे.
या व्हिडिओला विविध स्तरांतील नागरिक, पर्यावरणप्रेमी, महिलावर्ग, अभ्यासक आणि संवेदनशील तरुणाईकडून या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर होत असून, मतदान म्हणजे केवळ अधिकार नव्हे, तर निसर्ग आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे, अशी भावना नागरिकांनी बोलून दाखवली आहे.

