मुंबई–वडोदरा महामार्गामुळे गंजाडमधील कोहराली पाड्याचा रस्ता बाधित; नागरिकांची होतेय गैरसोय
मुंबई-वडोदरा महामार्गामुळे कोहराली पाड्यातील नागरिकांना बसतोय फटका
कासा, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या मुंबई- वडोदरा या नवीन द्रुतगती महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना, त्याचा फटका मात्र कोहराली पाडा या वस्तीतील नागरिकांना बसत आहे. या महामार्गाच्या बांधकामामुळे येथील मुख्य रस्ता पूर्णपणे बाधित झाल्याने शेकडो नागरिकांना दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पूर्वी या पाड्यातून डहाणू-कासा महामार्गावर जाण्यासाठी थेट रस्ता उपलब्ध होता. मात्र, महामार्गाच्या कामामुळे हा मार्ग बंद झाला असून, आता नागरिकांना साधारण एक किलोमीटरचा वळसा घालून मुख्य रस्त्यावर यावे लागत आहे.
उपलब्ध पर्यायी मार्गाची स्थिती अत्यंत खराब असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या दुरवस्थेमुळे दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे महामार्गालगत असलेली ही वस्ती दळणवळणाच्या बाबतीत जणू एकाकी पडल्याचे मत येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. जो पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे, तो खराब असल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यसेवांवरही पडला आहे. अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचण्यासाठी कमी वेळ लागत होता; मात्र आता रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी साधारणपणे दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. अशात आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे खराब झालेल्या रस्त्याची तातडीने डागडुजी करून पर्यायी मार्गाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीदेखील ग्रामस्थांकडून होत आहे. येथील उपसरपंच कौशल कामडी यांनी सांगितले की, कोहराली पाड्यातील सुमारे १६ कुटुंबाची वस्ती महामार्गालगत आहे. त्यांचा दळणवळणाचा मार्ग हा महामार्गामुळे बाधित झाल्याने त्यांना आता पायवाटेच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. एवढेच नाहीतर रुग्णालयात जाण्यासाठी त्यांना मोठा वळसा घालावा लागत असून, महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक डी. वाघेला म्हणाले की, कोहराली पाड्याचा रस्ता महामार्गाच्या कामामुळे बाधित झाला आहे. महामार्ग सुरू होईपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांना करावा लागत असून, या मार्गाच्या दुरुस्तीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्याचादेखील आमचा प्रयत्न आहे.

