पंतनगरच्या पोलिस वसाहतीत तीन वर्षांपासून गढूळ पाणी
गढूळ पाण्याचा धोका
पंतनगरच्या पोलिस वसाहतीची समस्या तीन वर्षे दुर्लक्षितच
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) : मुंबईतील मोडकळीस आलेल्या पोलिस वसाहतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, या वसाहतींना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर परिसरातील पोलिस वसाहतीत तब्बल तीन वर्षांपासून घरगुती नळांना गढूळ पाणी येत असून, याकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
या वसाहतीतील १३ इमारतींमध्ये राहणाऱ्या पोलिस कुटुंबांना गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून अशुद्ध पाण्याचा सामना करावा लागत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या टोलेजंग इमारतींच्या बांधकामामुळे सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या जुनाट जलवाहिन्या खराब झाल्या असून, त्यामुळे नळांना सतत गढूळ पाणी येत असल्याचे रहिवासी सांगतात.
गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा धोका वाढला असून, अनेक कुटुंबांना दरमहा चार ते पाच हजार रुपये खर्च करून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत आहे.
याबाबत रहिवाशांनी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने तक्रारी करून पत्रव्यवहार केला आहे. मात्र, दोन्ही विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. मोठ्या जलवाहिन्यांतील बिघाडाबाबत तक्रार केल्यानंतर पालिका अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाण्यास सांगतात, तर सार्वजनिक बांधकाम विभाग वसाहतीबाहेरील पाणीपुरवठा पालिकेच्या अखत्यारीत येतो, असे सांगतो. या प्रशासकीय कोंडीत शेकडो कुटुंबे अडकली आहेत.
याप्रकरणी घाटकोपर ‘एन’ विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पालिकेचा अहवाल
रहिवाशांच्या मागणीनंतर पालिकेकडून पाण्याची तपासणी करण्यात आली होती. त्यात हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. १२ सप्टेंबर रोजी दादर येथील पालिकेच्या कार्यालयातून याबाबतचा अहवालही देण्यात आला असून, तो घाटकोपर ‘एन’ विभागाकडे उपलब्ध असतानाही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

