पालघर जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनची ११ वी जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न
जिल्हास्तरीय स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
कासा (बातमीदार) : पालघर जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ११ वी जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा रविवारी, ११ जानेवारी रोजी विरार येथे पार पडली. या स्पर्धेचे आयोजन साहस स्पोर्टस अकादमीतर्फे करण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने उपस्थित खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमींनी समाधान व्यक्त केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत सुमारे ३०० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. विविध वयोगटांतील खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेसाठी पालघर जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या अध्यक्षा उज्वला रवींद्र डामसे व सचिव कपिल रवींद्र डामसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स प्रशांत पाटील व सदानंद सनगले उपस्थित होते. या स्पर्धेत वसई, विरार, पालघर, बोईसर, वाडा, तलासरी व डहाणू येथून एकूण १३ क्रीडा संघांनी सहभाग घेतला होता.

