‘जी रामजी’ योजना ग्रामीण विकासाचा नवा मापदंड ठरणार

‘जी रामजी’ योजना ग्रामीण विकासाचा नवा मापदंड ठरणार

Published on

‘जी रामजी’ योजना ग्रामीण विकासाचा नवा मापदंड ठरणार
खासदार धैर्यशील पाटील यांचा पेणमध्ये विश्वास
पेण, ता. १३ (वार्ताहर) : केंद्र सरकारने ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या दिशेने ग्रामीण भागासाठी सुरू केलेली ‘जी रामजी’ (विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन- ग्रामीण) ही नवी योजना ग्रामीण विकासाचा नवा मापदंड ठरणार असल्याचे प्रतिपादन खासदार तथा भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केले. पेण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास तसेच गावांच्या सर्वांगीण प्रगतीला मोठा चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार पाटील म्हणाले की, आतापर्यंत ग्रामीण विकासासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या पारंपरिक चौकटीत काम केले जात होते. मात्र, बदलत्या काळाच्या गरजेनुसार केंद्र शासनाने ‘जी रामजी’ या नव्या कार्यपद्धतीचा अवलंब केला असून, यामध्ये केवळ मजुरीपुरते मर्यादित न राहता कौशल्यविकास, आजीविकेची साधने, दीर्घकालीन उत्पन्ननिर्मिती आणि पायाभूत सुविधा उभारणीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढून युवकांना स्थलांतर करावे लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘जी रामजी’ योजना ही रोजगार हमी योजनेसारखीच असून, येत्या काळात रोजगार हमी योजनेचे नाव बदलून ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत अकुशल कामगारांना विविध लाभांसह किमान १२५ दिवस रोजगाराची हमी देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरीब, शेतमजूर, भूमिहीन कामगार, महिला आणि युवकांना मोठा आधार मिळणार आहे. रोजगारासोबतच गावातील रस्ते, पाणीपुरवठा, जलसंधारण, शेतीपूरक कामे, सार्वजनिक सुविधा आदी विकासकामांनाही गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. खासदार पाटील पुढे म्हणाले की, ‘विकसित भारत’ हे स्वप्न साकारायचे असेल, तर ग्रामीण भारत मजबूत करणे अत्यावश्यक आहे. ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल, स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल आणि गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल. त्यामुळे या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवकांनी, महिलांनी आणि गरजू घटकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
...................
विशेष चोकट :
‘जी रामजी’ योजनेची ठळक वैशिष्ट्ये
केंद्र शासनाची नवी ग्रामीण रोजगार व आजीविका योजना
रोजगार हमी योजनेचे सुधारित स्वरूप
अकुशल कामगारांना किमान १२५ दिवस रोजगाराची हमी
रोजगारासोबत पायाभूत सुविधा व कौशल्यविकासावर भर
ग्रामीण युवक, महिला व गरीब घटकांना थेट लाभ
‘विकसित भारत’ संकल्पनेला ग्रामीण पातळीवर चालना

Marathi News Esakal
www.esakal.com