अवचित गडाचा मार्ग झाला सुकर

अवचित गडाचा मार्ग झाला सुकर

Published on

अवचित गडाचा मार्ग झाला सुकर
खारापटी गावातील तरुणांची श्रमदानातून रस्ता दुरुस्ती; दुर्गप्रेमींमध्ये समाधान
रोहा, ता. १३ (बातमीदार) : इतिहासाची साक्ष देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा अवचित गड हा रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा दुर्ग आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यानंतर या गडाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होते. खड्डे, दरडी कोसळणे, झाडी-झुडपांमुळे बंद होणारी वाट आणि पाण्याचा निचरा न झाल्याने निर्माण होणारे धोके यामुळे गडप्रेमी व पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. संबंधित प्रशासनाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर खारापटी गावातील गणेश आळी मित्र मंडळाच्या तरुणांनी पुढाकार घेत श्रमदानातून रस्ता दुरुस्तीची व्यापक मोहीम राबवली.
‘गड वाचवा, दुर्ग संवर्धन करा’ या भावनेतून प्रेरित होऊन रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत या तरुणांनी अवचित गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह पायवाटेची दुरुस्ती केली. पावसाळ्यात कोसळलेल्या दरडीमुळे आणि पाण्याच्या निचऱ्याअभावी तयार झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा पर्यटक घसरून पडण्याच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर तरुणांनी खड्डे बुजवणे, रस्त्यावर पडलेले मोठे दगड बाजूला काढणे, तसेच वळणावर अडथळा ठरणारी झाडी-झुडपे साफ करण्याचे काम युद्धपातळीवर पार पाडले. विशेषतः गडावर प्रवेश करण्यापूर्वी असलेल्या १० ते १५ फूट खोल फांजीमुळे दुर्गप्रेमींना मोठा धोका निर्माण होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी या तरुणांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाकडी पूल उभारून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता अवचित गडावर जाणारा मार्ग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर झाला आहे. या मोहिमेत गणेश आळी मित्र मंडळातील महेश चोरगे, जागृत पाटील, चेतन पाटील, शुभम पोकळे, कल्पेश पोकळे, रोहित सानप व केतन पीटनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली खारापटी गावातील अनेक तरुण सहभागी झाले होते. कुदळ, फावडे आणि इतर साहित्याच्या सहाय्याने सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान करत दुर्गसंवर्धनाचा आदर्श निर्माण केला.
.........
गडसंवर्धन आपले कर्तव्य
छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपणे हे केवळ प्रशासनाचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. निर्णयांची वाट न पाहता दुर्गप्रेमींना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे. भविष्यातही गड संवर्धनासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, असे गडप्रेमींनी सांगितले. या स्तुत्य उपक्रमामुळे गडप्रेमी व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले असून, अवचित गडावर जाण्याचा मार्ग आता अधिक सुखकर झाला आहे. या मोहिमेदरम्यान शिवजयंती उत्सव समिती, खारापटी यांच्या वतीने तरुणांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. परिसरातून या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com