तालुका प्रमुख शिंदेंच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिक आक्रमक

तालुका प्रमुख शिंदेंच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिक आक्रमक

Published on

तालुकाप्रमुख शिंदेंच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिक आक्रमक
रोहा, ता. १३ (बातमीदार) : शिवसेना (शिंदे गट) रोहा तालुकाप्रमुख अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने रोहा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पक्षश्रेष्ठींनी शिंदे यांचा राजीनामा मंजूर करू नये, अन्यथा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देतील, असा थेट इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.
अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत रोहे शहरासह ग्रामीण भागात शिवसेना संघटना तळागाळापर्यंत पोहोचवली आहे. बलाढ्य राजकीय ताकदीला टक्कर देत त्यांनी संघटना उभी केली. अनेक गावांत प्रत्यक्ष भेटी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेली धडपड, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग यामुळे शिंदे यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या राजीनाम्यामुळे केवळ एक पद रिक्त होणार नसून, सामान्य शिवसैनिकांवर अन्याय होईल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रोहा येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेकडो शिवसैनिकांनी आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या. यानंतर जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी उपस्थितांना धीर देत सांगितले की, तालुकाप्रमुख अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे यांच्या बाबतीत पक्षश्रेष्ठींचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहोत. त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी वरिष्ठ नेते, मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
......................................

Marathi News Esakal
www.esakal.com