तारापुरात जीवघेणे प्रदूषण

तारापुरात जीवघेणे प्रदूषण

Published on

तारापुरात जीवघेणे प्रदूषण
औद्योगिक वसाहतीलगतच्या गावांना फटका
निखिल मेस्त्री/ संतोष घरत
पालघर, ता. १३ ः आशिया खंडातील सर्वात मोठ्या तारापूर एमआयडीसी परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावत आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये वाढलेल्या प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक, औषधनिर्माण, रंग, प्लॅस्टिक आणि अन्य उत्पादन, अवजड उद्योगाचे कारखाने आहेत. कारखान्यांच्या धुरामुळे, विषारी वायूंनी परिसरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे, तर दुसरीकडे रस्त्यावरील धूळ वातावरणात मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या प्रदूषणामुळे सालवड, कोलावडे, सरावली, बोईसर, खैरा, पास्थळ पाम, तेंभी, कुंभवली आदी गावातील नागरिकांचे त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या हजारो कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही महिन्यांपासून नागरिकांना, कामगारांना दुर्गंधी, डोळ्यांची जळजळ, श्वसनास त्रास, सतत खोकला, डोकेदुखी, मळमळ अशा तक्रारी वाढल्या आहेत, तर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि आधीच श्वसनविकार असलेल्या रुग्णांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
-----------------------------------
हवेची गुणवत्ता खालावली
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या खैरा बोईसर येथील संकेतस्थळावर हवेची गुणवत्ता मंगळवारी दुपारी ११४ इतकी होती. हा निर्देशांक नागरिकांच्या आरोग्याला बाधक आहे. तसेच हवा निर्देशांक गुणवत्ता फलकावर २०२३ चा निर्देशांक दाखवण्यात येत असल्याने डिजिटल फलकातून जनजागृतीसाठी सुरू असलेल्या प्रदूषण मंडळाचे वाभाडे निघत आहेत.
------------------------------
कारवाईचा अभाव
औद्योगिक वसाहतीतील सर्व कारखान्यांचे नियमित पर्यावरणीय ऑडिट, ऑनलाइन प्रदूषण मोजणी यंत्रणा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई, तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. याशिवाय आरोग्य तपासणी शिबिरे, श्वसनविकारांसाठी उपचार सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची गरज आहे.
---------------------------
नियमांची पायमल्ली
तारापूर एमआयडीसीमधील हवा गुणवत्ता निर्देशांक चांगला नसल्यामुळे रस्त्यांवर पाणी, वातावरणात पाण्याचे फवारा मारण्याची सूचना कारखान्यांना आणि औद्योगिक विकास महामंडळाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. मात्र, मंगळवारी औद्योगिक वसाहतीमध्ये ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत कुठेही रस्त्यांवर पाणी किंवा वातावरणात पाण्याचे फवारे मारल्याचे दिसले नाही.
--------------------------------------
प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत हवा गुणवत्ता निर्देशांक तपासणे आणि त्या दृष्टीने उपाययोजना करणे यासंदर्भात एमआयडीसी आणि सर्व कारखान्यांची संस्था असलेली टीम तसेच कारखान्यांना आवश्यक सूचना दिल्या जात आहेत.
- राजू वसावे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

Marathi News Esakal
www.esakal.com