मतदान केंद्रावर सैनिकांच्या शौर्याची माहिती
मतदान केंद्रावर सैनिकांच्या शौर्याची माहिती
उल्हासनगरात विविध संकल्पनांनी सजली आदर्श केंद्रे!
उल्हासनगर, ता. १३ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेच्या २० प्रभागांतील ७८ वॉर्डांसाठी १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरात एकूण १२४ ठिकाणी ५९६ मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून सहा ‘आदर्श’ आणि दोन ‘सखी’ मतदान केंद्रे विविध नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित सजवण्यात आली आहेत. आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस आणि उपायुक्त विशाखा मोटघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने ही यंत्रणा उभी केली आहे. पालिकेच्या शाळा, खासगी शाळा, समाजमंदिरे आणि वसतिगृहे अशा १२४ वास्तूंमध्ये ही केंद्रे उभारण्यात आली आहेत.
मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना माहिती मिळावी आणि त्यांचे लक्ष वेधले जावे, यासाठी विविध संकल्पना साकारल्या आहेत. सेंच्युरी रेयॉन शाळेत २०२४ मधील भारताचे ऑलिंपिक सुवर्णपदक यश, शाळा क्रमांक १७ मध्ये भारतातील पाच महान शास्त्रज्ञांची माहिती आणि छायाचित्रे, बालकन जी बारी शाळेत भारतीय सेना, नेव्ही आणि वायू दलाच्या शौर्याची माहिती, चांदीबाई कॉलेजमध्ये उल्हासनगर शहराची समृद्ध संस्कृती, विजयाताई विद्यामंदिरात ‘हरित मतदान केंद्र’ - पर्यावरण रक्षणाचा संदेश, स्वामी शांतीप्रकाश विद्यालयात युनेस्कोने जाहीर केलेले महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ले, गुरुनानक शाळेत (सखी केंद्र) महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी दोन विशेष केंद्रे उभारण्यात आली आहेत.
सोयीसुविधा पुरविण्यावर भर
मतदान केंद्रे केवळ माहितीपूर्ण नसून तेथे पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे आणि बसण्यासाठी आसनव्यवस्था यांसारख्या सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. विशेषतः सखी केंद्रांची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आली असून, महिला मतदारांना सन्मानपूर्वक वातावरण मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. मतदान ही केवळ प्रक्रिया नसून तो लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, यासाठी आम्ही या विशेष थीम्स साकारल्या आहेत, अशी माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली.

