मतदानासाठी प्रशासन सज्ज
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांच्या गुरुवारी (ता. १५) होणाऱ्या निवडणुकीसाठी दोन्ही ठिकाणचे प्रशासन सज्ज झाले आहे. नवी मुंबईत १,१४८ केंद्रांकरिता सहा हजार ८९० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २८ प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनेल पद्धतीने होत आहे. १ ते २७ प्रभागांमध्ये अ, ब, क, ड अशा चार जागांकरिता व २८ व्या प्रभागामध्ये अ, ब, क अशा तीन जागांकरिता नागरिकांना मतदान करायचे आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत नियमितपणे आढावा घेतला जात आहे. निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब दांगडे, तसेच निवडणूक निरीक्षक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर यांच्यामार्फतही निवडणूकविषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिल्यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. महापालिकेच्या १११ जागांसाठी ५९४ उमेदवार रिंगणात उभे आहेत. नवी मुंबईतील मतदान केंद्रांवर नियोजन करण्यासाठी महापालिकेने दोन दिवस आधीपासून तयारी केली आहे. निवडणुकीसाठी आठ विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापित असून, त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वितरण व संकलन केले जाणार आहे.
निवडणुकीकरिता १८५ ठिकाणांवर १,१४८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्रावरील कामकाजाकरिता मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान केंद्र अधिकारी व शिपाई अशा एकूण ६,८९० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांची दोन प्रशिक्षणे पूर्ण झालेली आहेत. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसही सज्ज असणार आहे.
असे आहे नियोजन
- निवडणुकीकरिता १,४०० हून अधिक कंट्रोल युनिट व ३,७०० हून अधिक बॅलेट युनिट प्राप्त झाली असून, सर्व मतदान यंत्रांची प्रथम स्तर तपासणी केली आहे.
- सर्व मतदान यंत्रे सीलबंद करून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निर्माण केलेल्या स्ट्राँग रूममध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवली आहेत.
- सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज असून, संपूर्ण मतदान प्रक्रियेवर वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षामार्फत बारकाईने लक्ष राहणार आहे.
- प्रत्येक विभागामध्ये एक महिला विशेष-सखी मतदान केंद्र (पिंक बूथ), तसेच पर्यावरणशील आदर्श मतदान केंद्र (ग्रीन बूथ) स्थापित करण्यात येत आहेत.
- निवडणुकीच्या कामकाजाकरिता १९२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
एकूण मतदार ९,४८,४६०
पुरुष मतदार ५,१६,२६७
महिला मतदार ४,३२,०४०
इतर मतदार १५३
मतदान केंद्रे १,१४८
कर्मचारी ६,८९०
कंट्रोल युनिट १,४००
बॅलेट युनिट ३,७००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

