विकासाच्या प्रवाहात आम्हाला स्थान असणार का ?

विकासाच्या प्रवाहात आम्हाला स्थान असणार का ?

Published on

विकासाच्या प्रवाहात आम्हाला स्थान असणार का?
तृतीयपंथी मतदारांचा सवाल
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः तृतीयपंथी समाजाला मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी पालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून प्रतिनिधित्व मिळण्याबाबत अपेक्षाभंग झाला आहे. एकाही राजकीय पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आमच्या समस्यांना कोण वाचा फोडेल, असा सवाल तृतीयपंथी समाज करीत आहे. समाज आम्हाला स्वीकारू लागला आहे. मात्र, राजकीय पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राज्यभर पालिका निवडणुका सुरू आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष सोडल्यास कोणत्याही पक्षाच्या जाहीरनामात तृतीयपंथींना स्थान देण्यात आलेले नाही. ठाणेप्रमाणे मुंबई शहर व मुबई उपनगरांत तृतीयपंथी मतदाराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या मुबईतच तृतीयपंथी समाजाची लोकसंख्या एक हजाराहून अधिक आहे. यामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३२ तर मुंबई शहर जिल्‍ह्यामध्ये २४४ पेक्षा अधिक मतदारांचा समावेश आहे.
देशात चार लाखांहून अधिक व राज्यात लाखाहून अधिक तृतीयपंथींची संख्या आहे. मात्र, पालिका निवडणुकीत काही पक्षाचा अपवाद वगळता एकाही पक्षाच्या राजकीय आणि विकासाच्या अजेंड्यात आम्हाला स्थान मिळाले नसल्याची खंत पिंकी दिशा शेख यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला असला तरी पालिका निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचे त्यांनी सागितले.
तृतीयपंथींकरिता शाळा, शौचालय, रोजगार, निवारा, मोफत शिक्षण व उच्च शिक्षण, कल्याणकारी महामंडळ, बचत गटांना अनुदान असे कित्येक प्रश्न सोडवण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तरी स्वीकृत नगरसेवकपदासाठी आमचा विचार होईल, अशी अपेक्षा आहे. ही संधी मिळाल्यास तृतीयपंथींचे प्रश्न मार्गी लावता येईल अन्यथा इतरांना आमचे प्रश्नच कळत नाहीत, असे पूजा खान यांनी सांगितले.

तृतीयपंथींसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे. विकासाच्या प्रवाहाच्या गतीत आमचा कुठे विचार होणार आहे का?
- प्रिया पाटील, प्रकल्प अधिकारी- किन्नर माँ, संस्था

अनेक तृतीयपंथी समाजकारणात सक्रिय आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी देताना राजकीय पक्ष सामाजिक लिंगभेद करीत आहे. महिला आरक्षणाप्रमाणे तृतीयपंथींना आरक्षण देण्यात यावे.
- वृषाली दिशा, सामाजिक कार्यकर्ते

Marathi News Esakal
www.esakal.com