शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विद्युत वाहिन्यांचे भूत
अति उच्चदाब विद्युत वाहिन्यांचा शेतकऱ्यांना ‘शॉक’
नवसारी-पडघे, बोईसर-पुणे जमिनी बाधित; भरपाई नाममात्र
दिलीप पाटील ः सकाळ वृत्तसेवा
वाडा, ता. १४ ः नवसारी-पडघे पाॅवरग्रीड, बोईसर ते पुणे व खावडा पाॅवर ट्रान्समिशन कंपनीमार्फत अति उच्चदाब क्षमतेच्या विद्युत वाहिन्या व मनोरे उभारण्याचे काम सुरू केले असून, शेतकऱ्यांच्या जमिनीतून हे प्रकल्प जात आहेत, परंतु या बदल्यात शेतकऱ्यांना नाममात्र भरपाई दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे, तर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर व इतर हक्कातही कंपनीचे नाव लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वाडा व मुरबाड येथील कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. वाडा कोलम या भाताच्या वाणाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भातपिकाबरोबर येथील शेतकरी कडधान्य, फळबागा, फुलशेती व फळशेती अशी विविध उत्पादने घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. असे असताना अनेक प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. आता नवसारी-पडघे पाॅवरग्रीड, बोईसर ते पुणे व खावडा पाॅवर ट्रान्समिशन कंपनीमार्फत अति उच्चदाब क्षमतेच्या विद्युत वाहिन्या व मनोरे उभारण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पातील बाधित जमिनीची मात्र नाममात्र भरपाई मिळत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत असून विरोध करत आहे.
शेतकऱ्याची अवस्था द्विधा
ज्या जमिनीतून प्रकल्प गेला आहे ती जमीन विकायची असेल, तर भाव कमी मिळतो. शिवाय विद्युत वाहिन्यांच्या ठिकाणी बांधकाम करता येत नाही किंवा कूपनलिका मारता येत नाही. तसेच जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर व इतर हक्कात कंपनीचे नाव लागते. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था द्विधा झाली आहे.
धर्मवीर विचार मंचाचे निद्रा आंदोलन
वाडा विक्रमगड व जव्हार तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति चौ.मी. १० हजार रुपये इतका एकसमान भार देण्यात यावा, बाधित शेतकऱ्यांना पाच पटीने मोबदला द्यावा, एक तालुका एक भाव जाहीर करताना वाडा तालुक्यातील बोरांडे गावातील रेडी रेकनरचा दर १,२५३ चौमी लावण्यात आला, परंतु यापूर्वी डाकिवली येथे १,४४१ चौमी इतका भाव दिला होता. तो गृहीत धरण्यात का आला नाही, याबाबतचा लेखी खुलासा मिळावा. आंदोलनकर्त्यांसोबत तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात यावे, या मागण्यांसाठी निद्रा आंदोलन सुरू केल्याचे धर्मवीर विचार मंचाचे अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या जमिनीत वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. मात्र, योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार व प्रशासन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहेत.
- प्रफुल्ल पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, पालघर
माझ्या गट नंबर ६१८ या जागेतून विद्युत वाहिनी जात असून, माझा विरोध असतानाही पोलिस बंदोबस्तात हे खोदकाम करण्यात आले आहे. नुकसानभरपाईचे काय करणार याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. ही कंपनी जबरदस्तीने काम करीत आहे.
- आदित्य मोहन घरत, बाधित शेतकरी, डाकिवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

