भंगारातील आठ गाड्यांना आग
भंगारातील आठ गाड्यांना आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : साकेत रोडवरील राबोडी ट्रॅफिक पोलिस चौकीजवळ परिसरातील भंगारात असलेल्या सात ते आठ वाहनांना आग लागली. ही घटना बुधवारी (ता. १४) दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले. ठाणे राबोडी परिसरातील साकेत रोडवरील भंगारात असलेल्या वाहनांना आग लागल्याची माहिती दक्ष नागरिक सूर्यकांत सुर्वे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यावर काही मिनिटांत आग आटोक्यात आली. दरम्यान, या घटनेत मोठ्या प्रमाणात त्या परिसरात धूर झाला होता. या वेळी एक वॉटर टँकर आणि एक फायर वाहन पाचारण केले होते.

