उरणात पोपटी पार्ट्यांची चवदार रंगत सुरु
माजी विद्यार्थ्यांनी लुटला पोपटीचा आनंद
कोप्रोलीत रंगली गप्पांची मैफील
उरण, ता. १४ ( वार्ताहर) : हिवाळाच्या काळात कोकणच्या अनेक पट्ट्यांत ‘पोपटी’च्या पार्ट्या रंगलेल्या दिसतात. उरण तालुक्यातील ‘पोपटी’ तर सर्वत्र प्रसिद्ध आहे. याच पोपटीचा आनंद येथील फुंडे महाविद्यालयातील १९९८-९९ मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी लुटला. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत संपूर्ण दिवस आनंदात घालवला.
फुंडे महाविद्यालयातील हे माजी विद्यार्थी रविवारी, ११ जानेवारी रोजी कोप्रोली येथे जमले होते. या निमित्त त्यांनी पोपटीचा बेतही आखला होता. त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी सोबत आणल्या होत्या, मात्र त्यांना उरण तालुक्यात लागवड केल्या जाणाऱ्या वालाच्या शेंगा काही मिळाल्या नाहीत, मग त्यांना पुण्यावरून आलेल्या पावटा शेंगावर समाधान मानावे लागले. पोपटी करताना भामरुडाचा पालाही महत्त्वाचा असतो, कारण त्यानेच मडक्यात ठेवण्यात आलेल्या पदार्थांना चव येते. मडक्यात भामरुडाच्या पालासह वालाच्या शेंगा, त्या नसतील तर तुरीच्या किंवा पावटाच्या शेंगासह कोंबडीचे मटन, अंडी व विविध प्रकारच्या भाज्या आणि काही विशिष्ट मसाले भरले जातात. ही मडकी मोकळ्या जागेत छोट्याशा खड्ड्यात ठेऊन त्यावर गवताची पेंड ठेवली जाते. मग गवताच्या पेंडीला आग लावून काही मिनिटे ही पोपटी शिजण्याची वाट पाहिली जाते. अशात पोपटीचा आनंद घेण्याचा निर्णय फुंडे महाविद्यालयातील विद्यार्थांनी घेतला व थेट कोप्रोली गाठली. तेथील एका शेतात पोपटी बनवून तिचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी आपल्या महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. गप्पा-गोष्टी व गाण्यांच्या मैफिलीसह मजेशीर किस्से सांगत एकप्रकारे वेगळी धमालच या माजी विद्यार्थ्यांनी या एकदिवसीय पिकनिकमध्ये केली.
हिवाळ्यात विदर्भात, खान्देशात ज्याप्रकारे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजून करण्यात येणारी हुर्डा पार्टी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे रायगड-उरणमधील अनेक भागांत वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे. शेतात किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धमाल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू होते. या पोपटी पार्टीदरम्यान कुठे काव्यसंमेलन रंगते, तर कुठे गोष्टींची मैफल ही. असाच बेत फुंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारत, पुढील वर्षीही या पोपटी पार्टीचे आयोजन करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. यावेळी आपल्या जुन्या मित्रांना एकत्र आणण्याचे काम हे मेघा भोईर, संजीवनी म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, संतोष जोशी, अलंकार म्हात्रे, मेघनाथ पाटील, संध्या घरत, उत्तम पाटील, गंधार पाटील, प्रभाकर गावंड, गिरीश पाटील, महेंद्र घरत, दिनेश म्हात्रे, रुपाली म्हात्रे, सुरेखा म्हात्रे, दमयंती पाटील, रंजित माळी, मनोजकुमार ठाकूर, सुवर्णा पाटील, राजेंद्र पाटील, विनोद ठाकूर, ज्योत्स्ना पाटील, प्रसाद पाटील, नवनीत पाटील व नितीन नारंगीकर यांनी केले. यावेळी काही मित्रांची बच्चे कंपनीही या पोपटी पार्टीला उपस्थित होती व त्यांनीही आपल्या आई-वडिलांसोबत या पोपटी पार्टीचा आनंद घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

