पतंगांमुळे पक्ष्यांच्या जीवावर ‘संक्रांत’

पतंगांमुळे पक्ष्यांच्या जीवावर ‘संक्रांत’
Published on

पतंगांमुळे पक्ष्यांच्या जीवावर ‘संक्रांत’
मांजामुळे ८० हून अधिक पक्षी जखमी, कबुतरांचे सर्वाधिक प्रमाण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मकर संक्रांत हा आनंद, उत्साह आणि नव्या वर्षाची सुरुवात करणारा सण असला, तरी याच दिवशी आकाशात उडवण्यात येणाऱ्या पतंगांमुळे अनेक निरपराध पक्ष्यांच्या जीवावर बेतत असल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार मांजामुळे यंदा मुंबईत ८० हून अधिक पक्षी गंभीर जखमी झाले असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.
परळ येथील बैलघोडा पशुवैद्यकीय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, संक्रांतीच्या दिवशी शहराच्या विविध भागांतून मांजात अडकलेले जखमी पक्षी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण कबुतरांचे असून, त्याखालोखाल घारी, बगळे यांचा समावेश आहे.
रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, जखमी झालेल्या ७२ कबुतरांपैकी १२ कबुतरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठ कबुतरांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले, तर उर्वरित कबुतरांवर शस्त्रक्रिया उपचार सुरू आहेत. याशिवाय १८ हून अधिक घारींवर उपचार करण्यात आले असून, एका झोपडपट्टी परिसरातून मांजा पायात घट्ट अडकल्याने जखमी झालेल्या एका बगळ्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संक्रांतीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जात असल्याने आकाशात मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यांना मांजाचा सर्वाधिक धोका निर्माण होतो. पतंग तुटल्यानंतर हा मांजा झाडे, विजेच्या तारांवर अडकतो आणि उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख, मान किंवा पाय त्यात अडकतात. परिणामी अनेक पक्षी गंभीर जखमी होतात, तर काहींचा जागीच मृत्यू होतो.

संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे विविध प्रकारचे जखमी पक्षी दाखल होतात. यंदाही ८० हून अधिक पक्षी रुग्णालयात आणले गेले आहेत. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. अनेक वेळा प्राणीमित्र स्वतः पुढाकार घेऊन जखमी पक्षी रुग्णालयात आणतात, ही सकारात्मक बाब आहे, असे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मयुर डंगर यांनी सांगितले.

पक्षीप्रेमींचे आवाहन
पक्षीप्रेमी संस्था आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नायलॉन किंवा चायनीज मांजामुळे पक्ष्यांच्या गळ्यावर खोल जखमा होतात, पंख कापले जातात आणि उडण्याची क्षमता कायमची नष्ट होते. अशा जखमी पक्ष्यांना नैसर्गिक अधिवासात परतणे कठीण होते. यामुळेच दरवर्षी संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना पर्यावरणपूरक कापसाचा मांजा वापरण्याचे, तसेच शक्य असल्यास पतंग उडवण्यावर मर्यादा ठेवण्याचे आवाहन करण्यात येते. आनंद साजरा करताना इतर जीवांचे प्राण धोक्यात येऊ नयेत, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे पक्षीप्रेमींनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com