नायर-केईएमची एमआरआयची समस्या झाली कमी

नायर-केईएमची एमआरआयची समस्या झाली कमी

Published on

नायर-केईएमची एमआरआयची समस्या झाली कमी
चार खासगी केंद्रांशी सामंजस्य कराराचा फायदा
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : नायर आणि केईएमसारख्या प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये एमआरआय चाचण्यांसाठी लागणारी दीर्घ प्रतीक्षा अनेक वर्षांपासून रुग्णांसाठी मोठी अडचण ठरत होती. नायर आणि केईएम स्वतःची यंत्रणा मर्यादित असल्याने निदान प्रक्रियेत विलंब होत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन चार खासगी एमआरआय केंद्रांशी सामंजस्य करार करण्यात आल्याने ही अडचण मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे रुग्णांना महागड्या खासगी पर्यायांकडे वळावे लागणार नाही. महापालिकेच्या ठराविक दरातच एमआरआय चाचण्या उपलब्ध करून देण्यासाठी खासगी केंद्रांशी सहकार्य करार करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही वेळेत आणि परवडणाऱ्या दरात तपासणी शक्य होत आहे. पूर्वी मर्यादित क्षमतेमुळे अनेक रुग्णांना आठवड्यांपासून महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती, ती अडचण आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार या सहकार्य करारामुळे दररोज होणाऱ्या एमआरआय चाचण्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली असून, तातडीच्या प्रकरणांना प्राधान्य देता येत आहे. शासकीय रुग्णालयांतील रेडिओलॉजिस्टचे तांत्रिक मार्गदर्शन कायम ठेवून तपासण्या केल्या जात असल्याने निदानाच्या गुणवत्तेवर परिणाम होत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. स्वतःची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत ही व्यवस्था रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले. नायर आणि केईएमवरील ताण कमी करण्यासाठी छोटा सायन परिसरातील महापालिकेचे सार्वजनिक-खासगी भागीदारी पीपीपी एमआरआय केंद्र गरजेनुसार ओपीडी आणि दाखल रुग्णांसाठी पर्याय ठेवण्यात आले होते. याचसोबत आता चार खासगी एमआरआय केंद्रांशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या एमआयआर केंद्रांचा समावेश
* जगजीवन राम रुग्णालय परिसरातील एमआरआय केंद्र
* केईएमसमोरील ‘आरती स्कॅन्स’
* केईएमसमोरील ‘कृष्णा डायग्नोस्टिक’
* २४×७ हेल्थकेअर डायग्नोस्टिक

एमआरआय चाचणीचे दर किती?
* साधी एमआरआय चाचणी : २,५०० रुपये
* कॉन्ट्रास्टसह एमआरआय चाचणी : सुमारे ३,३०० रुपये
(काही केंद्रांवर कॉन्ट्रास्टचा खर्च केंद्रच उचलते, तर काही ठिकाणी सुमारे ८०० रुपये अतिरिक्त आकारले जातात.)
खासगी बाजारात हीच चाचणी ५,००० ते २०,००० रुपये इतकी महाग असल्याने शासकीय सहकार्य करार रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

रुग्णांना कसे नेले जाते?
* दाखल रुग्ण - रुग्णवाहिकेतून थेट संबंधित केंद्रांपर्यंत नेले जातात.
* ओपीडी रुग्ण – जवळच्या केंद्रात स्वतः जाण्याचा पर्याय; गरज असल्यास रुग्णवाहिकेची सुविधा.
* गंभीर आणि तातडीच्या रुग्णांना प्राधान्य देऊन एमआरआय चाचणीची वेळ निश्चित केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com