प्लास्टिकच्या आक्रमणामुळे पारंपरिक बांबू व्यवसाय अडचणीत

प्लास्टिकच्या आक्रमणामुळे पारंपरिक बांबू व्यवसाय अडचणीत

Published on

पारंपरिक बांबू व्यवसाय अडचणीत
शासन योजना कागदावरच राहिल्याने कारागिरांचा प्रश्न ऐरणीवर

कासा, ता. १५ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांबू लागवड वाढवून रोजगारनिर्मिती व आर्थिक लाभ साध्य करण्यासाठी विशेष नियोजन जाहीर करण्यात आले होते. या अनुषंगाने विविध भागांत मार्गदर्शन शिबिर घेत शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, शासनाची ही योजना कागदावरच राहिल्याने बांबू कारागिरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एकेकाळी ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक घरात बांबूच्या वस्तू हमखास आढळायच्या. स्वयंपाकघर, शेतीकाम, धान्य साठवणूक अशा विविध कामांसाठी बांबूच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. मात्र, कालांतराने स्वस्त, हलक्या, आकर्षक आणि सहज उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंनी बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल प्लॅस्टिककडे झुकला आणि बांबू वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे शासनाने बांबू लागवडीवर भर देण्याबरोबरच तयार वस्तूंना बाजारपेठ, योग्य दर, शासकीय खरेदी व प्रचार-प्रसाराची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मत बांबू कारागिरांकडून व्यक्त होत आहे. प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे धोके लक्षात घेता बांबू वस्तूंचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

चौकट -

आधुनिकतेच्या नावाखाली बांबूच्या वस्तू केवळ शोभेच्या वस्तू म्हणून वापरल्या जाऊ लागल्याने मूळ उपयोगिता बाजूला पडत चालली आहे, असे मत स्थानिक बांबू कारागीर तरुण पाटील यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, पूर्वी आमच्या वस्तूंना मोठी मागणी होती. आता प्लॅस्टिकमुळे आमचा व्यवसाय जवळजवळ बंद पडला आहे. मेहनत जास्त आणि मोबदला कमी असल्याने अनेकांनी हा व्यवसायदेखील सोडला आहे.

चौकट -

बांबूपासून वस्तू तयार करणे ही अत्यंत कष्टाची आणि कौशल्यपूर्ण प्रक्रिया आहे. जंगल किंवा मळ्यातून बांबू कापूण ते वाळवत, त्यावर प्रक्रिया करणे. ही सर्व प्रक्रिया घडल्यानंतर त्या बांबूपासून चाळण्या, टोपल्या, सुप, झाडू, चटई, धान्य साठवणुकीच्या पेट्या इत्यादी वस्तू साकारल्या जातात. या सर्व प्रक्रियेस खूप मेहनत असून वेळही जास्त लागतो. इतक सर्व करूनही बाजारात बांबूच्या वस्तूंना म्हणावे तसे दर मिळत नाहीत. परिणामी अनेकांनी हा पारंपरिक व्यवसाय सोडून शेतीमजुरी किंवा छोटे-मोठे व्यवसाय स्वीकारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com