डहाणू पारनाका समुद्रकिनारी संक्रांतीनिमित्त भव्य पतंगोत्सव

डहाणू पारनाका समुद्रकिनारी संक्रांतीनिमित्त भव्य पतंगोत्सव

Published on

डहाणूमध्ये संक्रांतीनिमित्त भव्य पतंगोत्सव; सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

कासा, ता. १५ (बातमीदार) : मकर संक्रांतीनिमित्त बुधवारी (ता. १४) डहाणू तालुक्यातील पारनाका समुद्रकिनाऱ्यावर भव्य पतंगोत्सव साजरा करण्यात आला आहे. या उत्सवात सर्वधर्मीय व सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. संक्रांतीनिमित्त जात-पंथ, धर्मभेद विसरून नागरिक एकत्र आल्याचे सुंदर चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.

डहाणू पारनाका समुद्रकिनाऱ्यासह चिंचणी, नरपड, चिखले आदी समुद्रकिनाऱ्यांवरही पतंगोत्सवाची धूम होती. याशिवाय उंबरगाव, वापी, सिल्वासा, वलसाड इत्यादी परिसरातून आलेले अनेक पर्यटक व स्थानिक नागरिकांनीही डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर पतंग उडविण्यासाठी सहभाग घेतला होता. त्यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रंगीबेरंगी, विविध आकारांच्या आणि आकर्षक, तसेच नक्षीदार पतंग आकाशात झेपावत असल्याने, ते दृष्य पाहण्यासाठी येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. बच्चेकंपनीपासून तरुणाई, तर महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. काही ठिकाणी सुमधुर संगीत, तर काही ठिकाणी ढोल-ताशांच्या तालावर युवकांनी एकमेकांच्या पतंग कापल्यानंतर जल्लोष केला.

चौकट

पोलिसांचा कडक पहारा

सुरक्षिततेच्या दृष्टीने डहाणू नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. समुद्रकिनारी गर्दी वाढल्याने पोलिसांकडून सतत देखरेख ठेवली जात होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गस्त वाढविण्यात आली होती. स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेसाठीही कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संक्रांतीच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन येथे घडले.

Marathi News Esakal
www.esakal.com