जुन्या टपाल कार्यालयाची दयनीय अवस्था
जुन्या टपाल कार्यालयाची दयनीय अवस्था
ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वास्तू भग्नावस्थेत; नवीन इमारतीची प्रतीक्षा
माणगाव, ता. १५ (वार्ताहर) : माणगाव शहराच्या इतिहासाची साक्ष देणारे आणि एकेकाळी परिसराच्या दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेले जुने टपाल कार्यालय आज अक्षरशः मृतप्राय अवस्थेत आहे. ब्रिटिशकालीन वारसा लाभलेली ही वास्तू सध्या पूर्णपणे भग्नावस्थेत गेली असून, भिंती कोसळलेल्या, छप्पर उडालेले आणि सर्वत्र झाडे-झुडपे व वेलींनी वेढलेली अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे माणगावकर नवीन इमारतीची प्रतीक्षा करत आहेत.
जुने माणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर असलेले मूळ टपाल कार्यालय सुमारे १५ गुंठे जागेत पसरलेले असून, ते पूर्णतः पडीक अवस्थेत आहे. वड-पिंपळाच्या भल्या मोठ्या वेलींनी ही ऐतिहासिक वास्तू अक्षरशः गिळून टाकली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना ही ब्रिटिशकालीन इमारत अस्तित्वात आहे, हेही लक्षात येऊ नये, इतकी ती झाकली गेली आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचेही चित्र दिसून येत असून, सर्वत्र पाला-पाचोळा व भयाण शांतता पसरलेली आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे. शासकीय अधिकाऱ्यांची अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे माणगावचा हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सुमारे आठ वर्षांपूर्वी तत्कालीन पोस्टमास्तर स्व. बनेश जोशी यांनी या जागेवर नवीन टपाल कार्यालय उभारण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मुंबई व दिल्ली येथील मुख्य कार्यालयांकडे पाठवली होती. त्या अनुषंगाने जागेचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र, आठ वर्षे उलटून गेली तरी प्रत्यक्षात एकही वीट रचली गेली नाही. माणगावच्या वाढत्या लोकसंख्या आणि विकासाचा विचार करता, आधुनिक टपाल कार्यालय ही काळाची गरज बनली आहे. ऐतिहासिक वास्तूचे जतन करत त्याच जागेवर तातडीने नवीन टपाल इमारत उभारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा उद्याच्या पिढीला माणगावचा हा ब्रिटिशकालीन वारसा केवळ छायाचित्रांतच पाहायला मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
...........
भाड्यापोटी लाखोंचा खर्च
माणगावचे टपाल कार्यालय गेल्या तब्बल ५० वर्षांपासून स्वतःची इमारत नसल्याने भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहे. वेळेत स्वतःची इमारत उभारण्यात आलेली नसल्याने आजवर शासनाला लाखो रुपयांचा भाडे खर्च सहन करावा लागत आहे. सध्या माणगावचे मुख्य टपाल कार्यालय तसेच उपविभागीय टपाल कार्यालय मोरबा रोडवर, माजी आमदार अशोकदादा साबळे यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस असलेल्या दोन मजली भाडेकरू इमारतीत सुरू आहे. या इमारतीसाठी दरमहा सुमारे ३३ हजार रुपये भाडे दिले जाते. येथून माणगावसह तळा, पाली, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यांतील टपाल कार्यालयांचे कामकाज पाहिले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

