

सकाळचा उत्साह दुपारी मावळला
दुपारी १.३० पर्यंत २९.४८ टक्के मतदान
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची सुरुवात गुरुवारी (ता. १५) पार पडली. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानासाठी केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु, दुपारी एकनंतर मतदारांचा उत्साह डोंबिवलीत काहीसा मावळल्याचे दिसून आले. दुपारी दीड वाजेपर्यंत २९.४८ टक्के मतदानाची नोंद झाली.
डोंबिवली शहरात बहुतांश मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेची सकाळपासून शांततेत सुरुवात झाली. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी देखील सकाळीच मतदान केंद्र गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला. काही नोकरदार मंडळींना मतदानासाठी कार्यालयीन सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना काही तास उशिरा येण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे नोकरदार मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सकाळीच मतदार केंद्रावर रांगा लावल्या होत्या. नंतर गर्दी होत असल्याने सकाळीच येऊन मतदान करुन जाणे असा विचार त्यांनी केला. मात्र, सकाळपासून असलेल्या रांगा पाहून अनेकांचा हिरमोड झाला.
तर, काही मतदार केंद्रावर फारशी गर्दी आढळून आली नाही. त्यामुळे तेथील उमेदवार हे प्रत्येक सोसायटी, परिसरात जाऊन तेथील मतदारांना बाहेर पडण्यासाठी भेटीगाठी घेऊन, मतदारांच्या स्लिपा, नाव शोधून देणे, मतदान केंद्राबाहेर सूचना करणे अशी कामे स्वतः करत होते. सकाळी उत्साहात बाहेर पडलेला मतदार दुपारी बारानंतर उन्हाच्या झळा बसायला लागल्याने बाहेर पडला नाही. यामुळे तुरळक गर्दी काही मतदार केंद्रावर तर काही मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. दुपारपर्यंत डोंबिवलीत कोणत्याही मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे दिसून आले नाही. मतदारांना मतदान केंद्रावर जाता यावे यासाठी रिक्षा-दुचाकीची सोय पक्षांकडून करण्यात आल्या होत्या.
अटीतटीच्या लढती असलेल्या प्रभागात उमदेवार आणि त्यांचे कार्यकर्ते सकाळपासून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी धावपळ करत असल्याचे चित्र दिसत होते. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर आणि परिसरात पोलिस बंदोबंस्त आहे. कल्याण परिमंडळ तीन पोलिस उपायुक्त अतुल झेंडे हे स्वतः संपूर्ण परिक्षेत्रात फिरत होते. तसेच, पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या गाड्या शहराच्या विविध भागात शांततेचा संदेश देत फिरत आहेत.
शाई पुसली
डोंबिवलीत शांततेत मतदान सुरु असले तरी कल्याणमध्ये मात्र वातावरण काहीसे तापलेले दिसून आले. बोटावरची शाई पुसली जात असल्याचा आरोप उमेदवारांनी केला. कल्याण पॅनल नऊमध्ये मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेसच्या उमेदवार माधवी चौधरी यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जात आहे, असेच प्रकार करायचे असतील तर निवडणुका कशाला घ्यायच्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नेत्यांचे मतदान....
भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मनसेचे नेते राजू पाटील, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आपल्या कुटूंबासह मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. तसेच, मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन देखील केले.
डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २९ मध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजपा अशी लढत होत असून दोन दिवसांपूर्वी येथे उमेदवारांमध्ये रक्तरंजित राडा झाला. यावर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, जे झाले ते योग्य झालेले नाही. याविषयी येणाऱ्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींवर आळा घालणे हे महत्त्वाचे राहील. तर मनसेचे नेते राजू पाटील म्हणाले, डोंबिवली हे सांस्कृतिक शहर आहे, मात्र या शहराचे काय करुन ठेवले आहे. लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहीजे, त्यांनी व त्यांच्या चेल्यांनी काय करुन ठेवले आहे.
बोगस मतदान...
कल्याण पूर्व येथील गायत्री शाळेत मतदान करण्यासाठी सुमन गायकवाड या त्यांचे पती व मुलासह आल्या होत्या. परंतु, त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे त्यांना समजल्याने त्यांना मतदान करता आले नाही. कल्याण पूर्वेतील सेंट लुट्स या शाळेत देखील रमेश पवार यांच्या नावावर देखील आधीच मतदान झाले असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान करुन दिले नाही. त्यामुळे रमेश पवार यांनी देखील त्यांच्या नावावर झालेल्या बोगस मतदानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण पूर्व १८ मध्ये मतदानावेळी ईव्हीएम बंद
कल्याण पूर्व नेतेवली परिसरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये मतदानादरम्यान अडथळा निर्माण झाला. महानगरपालिकेच्या प्रबोधन बाळासाहेब ठाकरे शाळेतील ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली होती. मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण होऊन गोंधळ उडाला होता. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून ईव्हीएमची तातडीने दुरुस्ती व मतदान प्रक्रिया पुन्हा सुजवळपास रू केली. अर्धा तास गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
सुनीलनगरमध्ये राडा घालणारे बदलापूरचे आरोपी
डोंबिवलीत सुनीलनगर प्रभाग क्रमांक २९ मध्ये राडा करणाऱ्या लोकांमध्ये बदलापूरचे काही लोक अधिक संख्येने सहभागी होते. हे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक २९ मध्ये निवडणूक लढविणाऱ्या एका उमेदवाराचे नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मोबाईल चित्रीकरणात हे बदलापूरचे लोक स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे गुरूवारी सकाळी डोंबिवलीचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनीलनगर प्रभागात फेरी मारून पोलिसांना सुनीलनगर, आयरे भागात बाहेरची काही वाहने फिरत आहेत. त्यांच्या गाड्या प्राधान्याने तपासून त्यांना प्रभागाबाहेर घालवा, अशा सूचना केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.