उल्हासनगरात धुरंदर कोण?
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १५ : उल्हासनगर महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत असताना संपूर्ण शहरात कमालीची उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती न झाल्याने यंदाची निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याची नव्हे, तर थेट प्रतिष्ठेची आणि राजकीय ताकदीची लढाई ठरली होती. आरोप-प्रत्यारोप, उघड वाद आणि थेट संघर्षांनी रंगलेल्या या निवडणुकीत अखेर खरा धुरंदर कोण? हे ठरवण्याची वेळ आज आली आहे. प्रत्येक प्रभागातील निकाल उल्हासनगरच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा ठरणार असल्याने आजचा दिवस शहरासाठी अत्यंत निर्णायक आहे.
प्रचाराच्या दिवसांत आरोप-प्रत्यारोप, जाहीर सभांतील टीका-टोमणे, पोस्टरवॉर आणि कार्यकर्त्यांमधील तणाव यामुळे राजकीय वातावरण तापले होते. अनेकदा भाजप आणि शिंदे गटात उघड वाद झाले, तर काही प्रभागांत हे मतभेद थेट रस्त्यावर दिसून आले. युती नसल्याने प्रत्येक पक्षाला स्वतःची संघटनशक्ती, स्थानिक नेतृत्व आणि मतदारांवरील पकड सिद्ध करण्याची संधी आणि जोखीम दोन्हीही होती. काही प्रभागांत जुने धुरंदर आपली पकड कायम ठेवण्यात यशस्वी ठरतील, की नव्या चेहऱ्यांची सरशी होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर काही ठिकाणी बंडखोरी, स्थानिक समीकरणे आणि अपक्ष उमेदवारांनी निकालाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण केली आहे. त्यामुळे आजचा निकाल हा केवळ जागांची आकडेवारी न राहता, कोणाचा राजकीय दबदबा टिकून आहे आणि कोणाला धक्का बसतो, याचे स्पष्ट चित्र दाखवणारा ठरणार आहे.
आजचा निकाल उल्हासनगर महापालिकेची सत्ता ठरवण्याबरोबरच, भविष्यातील राजकीय समीकरणे, संभाव्य युती आणि नेतृत्वाची दिशाही ठरवणारा ठरणार आहे. त्यामुळेच संपूर्ण शहर एका प्रश्नाकडे डोळे लावून बसले आहे, उल्हासनगरात खरा धुरंदर कोण?
उत्सुकता शिगेला
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसोबत उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचेल हे निश्चित आहे. कुठे जल्लोष होणार, कुठे शांतता पसरलेली दिसणार, तर कुठे अपेक्षेप्रमाणे नसलेला निकाल धक्कादायक ठरणार याची चर्चा शहरभर रंगली आहे. युती न झाल्याचा फायदा नेमका कोणाला होतो आणि त्याची किंमत कोणाला मोजावी लागते, हे येत्या काही तासांत स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

