पहिल्याच मतदानाने तरुणाईमध्ये उत्साह

पहिल्याच मतदानाने तरुणाईमध्ये उत्साह
Published on

खारघर, ता. १५ (बातमीदार) : पालिका निवडणुकीत अनेक नवमतदारांनी पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावला. वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव नोंदवून मतदान केंद्रावर पोहोचलेल्या तरुण-तरुणींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदान यंत्रावर बटण दाबताना लोकशाहीचा भाग असल्याचा अभिमान वाटतो, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

महापालिका निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाही बळकट करावी, यासाठी पालिकेकडून विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जात होती. दरम्यान, खारघर आणि तळोजा परिसरात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण-तरुणींशी सवांद साधला. मतदान केल्याचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे मतदान केंद्रांवरील शिस्तबद्ध व्यवस्था, स्वयंसेवकांची मदत आणि सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे नव्या मतदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. लोकशाही मजबूत करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा असून, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा वाढता सहभाग ही सकारात्मक बाब आहे.

मतदान म्हणजे केवळ हक्क नाही, तर जबाबदारी आहे. सक्षम आणि जनतेच्या हितासाठी काम करणारा उमदेवार निवडून यावा, यासाठी मतदान केले आहे.
- खुशी किरीट पटेल, खारघर

पहिल्यांदा मतदान करताना खूप आनंद होत आहे. आपल्या लोकशाहीमुळे मला अधिकार मिळाला आहे. त्यामुळे जनतेचे सेवक म्हणून काम करावे, यासाठी मतदान केले आहे.
लोकशाहीचा एक भाग असल्याची जाणीव होत आहे.
- ईशानी सिंग, तळोजा वसाहत

पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार मिळाल्याने अभिमानाची भावना आहे. आजपर्यंत फक्त समस्या आणि तक्रारी ऐकत आलो, पण आता त्या बदलण्यासाठी निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, या भावनेतून मी आवर्जून मतदान केले.
- मोहिनी पाटील, घणसोली

आजच्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि महिलांची सुरक्षा हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. केवळ समाजमाध्यमांवर पोस्ट किंवा कमेंट करून मत व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदान करणे, जास्त प्रभावी आणि परिणामकारक आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून मतदान केले.
- तन्वी पवार, घनसोली

मतदान ही केवळ एक औपचारिकता नसून तो आपला हक्क आहे. जर आपल्याला व्यवस्थेत बदल हवा असेल, तर तो रस्त्यावरून नाही, तर मतपेटीतूनच घडू शकतो, हे लक्षात घेऊन मी उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी झाले.
- आयुशी ठोकर, ऐरोली

नवमतदार म्हणून आमचा आवाज आणि मत खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा तरुण मतदानाकडे दुर्लक्ष करतात, पण त्यामुळे निर्णय इतरांच्या हाती जातो. तरुणांनी उदासीन न राहता मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, कारण शहराचे आणि आपल्या भवितव्याचे चित्र आपल्या मतावर ठरत असते.
- आशा मानजी, ऐरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com