भिवंडीत तणावपूर्व वातावरणात मतदान
पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १५ : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळपासून शहरातील काही भागांत तणावपूर्ण वातावरण होते. तर काही ठिकाणी संथ गतीने मतदानाला सुरुवात झाली. विविध प्रभागांमध्ये शिवीगाळ, हाणामारी आणि पैसे वाटपाचे प्रकार घडल्याने मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी २३ प्रभागांतील ९० जागांसाठी तब्बल ४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), मनसे, शिवसेना (ठाकरे), कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी; तसेच अपक्ष उमेदवारांमुळे ही निवडणूक अत्यंत बहुरंगी व चुरशीची ठरली आहे. शहरात एकूण ७५० मतदान केंद्रे असून, त्यापैकी १५३ केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासूनच कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. उन्हामुळे दुपारी १.३० वाजेपर्यंत केवळ २६.१८ टक्के मतदान झाले होते.
शहरातील काही मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडल्याची माहिती मिळताच भिवंडीचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करून मतदान प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही ठिकाणी पैसे वाटप करताना तसेच बोगस मतदान करताना संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर आणि पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह अवचितपाडा व दांडेकरवाडी येथील मॉडेल बूथला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शांतीनगर रोडवरील मतदान केंद्र क्रमांक २२ आणि ६२ येथील महिला सखी (पिंक) मतदान केंद्रालाही त्यांनी भेट दिली.
समर्थकांमध्ये हाणामारी
प्रभाग क्रमांक १ मधील कोंबडपाडा येथे भाजप व कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांमध्ये मतदानावरून सकाळी व दुपारी हाणामारी झाली. निजामपूर भागातील पिलीस्कूल मतदान केंद्राजवळ राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारीचे प्रकार घडले. तसेच भोईवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. या घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवला असला, तरी अधिकृत गुन्हे दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, भिवंडी महापालिकेचे विरोधी पक्षनेते शेख खालिद गुड्डू यांना न्यायालयाकडून परवानगी मिळाल्याने ते ठाण्याहून भिवंडीत आले होते.
बोगस मतदान
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कल्याण रोडवरील नवी वस्ती परिसरात पैसे वाटप व बोगस मतदान करताना काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली. तर नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार संशयित बोगस मतदारांना ताब्यात घेतल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
ज्येष्ठांचे हाल
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांना सुलभरीत्या मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत. असे असतानाही भिवंडीतील काही ठिकाणी पहिल्या मजल्यावर मतदान केंद्रे ठेवल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाल्याची तक्रार करण्यात आली. संगमपाडा येथील महापालिका वसाहतीमधील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन हँग झाल्याने काही काळ मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला. याचा फटका विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बसला.
बोटावरील शाई गायब
मतदारांच्या बोटांना लावलेली शाई साबणाने किंवा पाण्याने सहज पुसली जात असल्याचा फायदा घेत अनेकांनी बोगस मतदान केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलाकर टावरे यांनी केला आहे. या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाकडून याची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

