मतदान केंद्रावर सुविधांची वानवा
मतदान केंद्रावर सुविधांची वानवा
पिण्यासाठी पाणी, वैद्यकीय बाबींकडे दुर्लक्ष; खुल्या मैदानातील मतदान केंद्रामुळे मतदारांबरोबरच कर्मचाऱ्यांचीही गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत आज गुरुवारी (ता. १५) मुंबईतील बहुतांश मतदान केंद्रांवार सुविधांची वानवा होती. मतदान केंद्रांवर मतदारांकरिता पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच अनेक मतदान केंद्रे खुल्या जागेत उभारण्यात आल्याने तेथे मोबाईल टाॅयलेट उभारली होती. पण त्यासाठी लागणारे पाणी टमरेलने घेऊन जावे लागत होते. त्यामुळे मतदारांबरोबरच कर्तव्यावर असलेल्या मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. त्याबाबत कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. काही मतदान केंद्रांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याचेही चित्र होते.
मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त आज मुंबई शहर आणि उपनगरांतील २२७ प्रभागांसाठी तब्बल १० हजार २३१ मतदान केंद्रे स्थापित करण्यात आली होती. त्यापैकी अनेक मतदान केंद्रे खुल्या जागेत उभारली होती. त्यामुळे मतदारांना भरउन्हात रांगा लावाव्या लागल्या. तसेच पिण्यासाठी पाणी नसल्यानेही मतदारांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्याशिवाय अनेक मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात येत होती. मात्र तो ठेवण्यासाठी मतदान केंद्रावर कोणतीच व्यवस्था नसल्याने मतदारांची चांगलीच कोंडी झाली होती. तसेच यंदा निवडणूक विभागाने मतदारांसाठी ना रिक्षा-टॅक्सी, ना बसची व्यवस्था केली होती. त्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठांची मतदान केंद्रावर पोहोचताना मोठी गैरसोय झाली.
वैद्यकीय अधिकारी नाहीत
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच उन्हाचा त्रास झाल्यास आवश्यक औषध, रक्तदान तपासणी करण्याची सुविधा होती. आज मात्र अनेक मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकारीच नव्हते. त्यामुळे दुपारी उन्हात रांग लावल्याने चक्कर आल्यास काय करावे, असा सवाल मतदारांकडून उपस्थित केला जात होता.
ज्येष्ठ, दिव्यांगांना त्रास
खुल्या जागेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्राच्या परिसरात अनेक खड्डे असल्याने ज्येष्ठ मतदारांना चालताना मोठी कसरत करावी लागत होती. तसेच दिव्यांगांची व्हीलचेअर घेऊन जाताना स्वयंसेवकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
अंधुक प्रकाशामुळे मशीनवरील चिन्ह दिसेना
प्रतीक्षानगर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मतदान केंद्र होते. छोटे वर्ग, मधल्या निमूळत्या जागा यामुळे मतदारांना दाटीवाटीने उभे राहावे लागत होते. शिवाय केंद्रातील प्रत्यक्ष मतदान करावयाच्या जागी अंधुक प्रकाशामुळे मशीनवरील चिन्ह स्पष्ट ओळखण्यास त्रास होत होता. सकाळी मतदानाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याने बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या.
निवडणूक आयोगाने पूर्ण तयारीनिशी निवडणुका घेणे अपेक्षित होते; मात्र मतदार याद्यांमध्ये घोळ, मोबाईल ॲपवर नावे सापडत नाहीत. तसेच मतदान केंद्रांवरील अपुऱ्या सुविधांमुळे मतदार पुरते त्रस्त झाले.
- भक्ती कदम, मतदार
आपला हक्क आणि जबाबदारी समजून प्रत्येक मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर येतो. मात्र येथे आल्यानंतर त्याला आपले नाव शोधण्यापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागला. हे थांबायला हवे.
- अलका जाधव, मतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

