मतदानासाठी केंद्र अधिकाऱ्यांचा मदतीचा हात
मतदानासाठी केंद्र अधिकाऱ्यांचा मदतीचा हात
अशिक्षित, दृष्टीहीन व वयोवृद्ध मतदारांसाठी सरसावले
दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १५ : उल्हासनगर महापालिका निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड तर काही मतदान केंद्रांवर वीजपुरवठा खंडित होण्याच्या मोजक्या घटना घडल्या. मात्र, या अडचणींमध्येही दोन–तीन मतदान केंद्रांवर केंद्र अधिकाऱ्यांनी माणुसकीचे उदाहरण समोर ठेवत मतदारांना मदतीचा हात दिल्याच्या घटना चर्चेचा विषय ठरल्या.
प्रत्येक मतदाराने ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव व चिन्ह पाहून संबंधित बटण दाबून मतदान करणे अपेक्षित असते. मात्र, प्रभाग क्रमांक १३ मधील वाघमारे हॉल येथील बूथ क्रमांक १ वर आलेल्या सीताबाई जवरे यांना मशीनवर बटण दाबल्यानंतरही ‘बिप’चा आवाज न ऐकू आल्याने संभ्रम निर्माण झाला. त्यांच्यासोबत असलेले पुत्र ॲड. संतोष जवरे यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर केंद्र अधिकाऱ्यांनी शांतपणे मशीन वापरण्याची पद्धत समजावून सांगितली. योग्य मार्गदर्शनामुळे अखेर सीताबाई यांची मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. याच प्रभागातील सार्वजनिक मित्र मंडळाच्या हॉलमधील मतदान केंद्रावर एक दृष्टीहीन वयोवृद्ध महिला मतदानासाठी दाखल झाली होती. त्यांच्यासोबत मुलगा व त्याच्या कुशीत लहान बाळ होते. कक्ष अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करत त्यांच्या मुलाला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आणि आवश्यक सहकार्य करत त्या वयोवृद्ध महिलेचा मतदानाचा हक्क सुरक्षितपणे बजावून घेतला. या घटनांमुळे तांत्रिक अडचणी असूनही लोकशाही प्रक्रियेत कोणताही मतदार मागे राहू नये, यासाठी केंद्र अधिकाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता मतदारांकडून विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.
मोबाईल टॉर्चचा प्रकाशात मतदान
मराठा सेक्शनमधील उल्हास विद्यालयातील मतदान केंद्रावर किशोर नावाचे वयोवृद्ध मतदार मतदानासाठी आले असता, ईव्हीएम असलेल्या कक्षात अंधुक प्रकाश असल्याने उमेदवारांची नावे व चिन्हे नीट दिसत नव्हती. ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, केंद्र अधिकाऱ्याने तत्काळ मोबाईल टॉर्चचा प्रकाश उपलब्ध करून दिला. त्या प्रकाशात किशोर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

