जिल्हा मुख्यालयाचा खडतर प्रवास
जिल्हा मुख्यालयाचा खडतर प्रवास
तीनही मार्ग खड्डेमय, कामास विलंब, नागरिक त्रस्त, खासदारांकडे लक्षवेध
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागला जोडणाऱ्या तीन प्रमुख मार्गांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, मुख्यालयापर्यंतचा प्रवास अक्षरशः कष्टप्रद झाला आहे. वडखळ ते अलिबाग महामार्ग, अलिबाग-रामराज मार्गे रोहा व साळवा मार्गे रोहा हे तीनही राज्यमार्ग खड्ड्यात गेल्याने प्रवाशांना त्रासाचा कस लागला आहे. काही दिवसांपूर्वीच साळवा येथे सर्वपक्षीय आंदोलन होऊनही कामाचा वेग अद्याप समाधानकारक नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.
साळवा मार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवला असल्याने वाहतूक संथ गतीने चालते. या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना असमतल रस्त्याचा तगडा फटका बसत आहे. दुसरीकडे वडखळ-पोयनाड-चेंढरे-कुरुळ बायपास या पट्ट्यात मोठमोठे खड्डे पडले असून, गेल्या पंधरवड्यात महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असली तरी कामाचा वेग मंद असल्याचे चित्र आहे.
तिसरा पर्याय असलेला अलिबाग-रामराज मार्गे रोहा हा रस्ता मागील तीन वर्षांपासून कामाच्या प्रतीक्षेत असून, उसर गावाजवळील काम अपूर्ण पडल्याने भलेमोठे खड्डे व पाणथळ झालेले भाग प्रवासाला धोकादायक ठरत आहेत. या परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना दैनिक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीदरम्यान प्रवीण ठाकूर यांनी खासदार सुनील तटकरे यांचे लक्ष वेधत ‘मुख्यालयाला जोडणारे रस्ते तातडीने सुधारावेत’ अशी मागणी केली. कामातील विलंबामुळे जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था कोलमडत असल्याचेही अधोरेखित केले.
कोट
शासकीय कामानिमित्ताने जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांना या खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर मुख्यालयातील अधिकाऱ्यांना प्रवास करण्यात अडचणी निर्माण होतात. मुख्यालयात येणारा एकही मार्ग सुस्थितीत नाही. पर्यटन व्यवसायालाही याचा फटका बसत आहे.
प्रवीण ठाकूर, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

