नवी मुंबईत वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर
नवी मुंबईत वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर?
ईव्हीएम बिघाड, दुबार मतदारांची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : नवी मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेअंतर्गत १११ नगरसेवकांच्या जागांसाठी गुरुवारी (ता. १५) शांततेत मतदान झाले. ६५६ उमेदवारांसाठी १,१४८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात काही ठिकाणी मतदान मशीन बंद पडणे, दुबार मतदार, शाई पुसण्याच्या प्रकारामुळे काही केंद्रांवर गोंधळ उडाला; परंतु संध्याकाळपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाल्याने २०१५च्या तुलनेत आज झालेल्या वाढीव मतदानाचा कोणाला फायदा होईल, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
महापालिका निवडणुकीत यंदा भाजप १११ तर शिवसेनेचे (शिंदे गट) १०९ उमेदवार होते. अनेक पक्षांनी मुख्यतः ठाकरे गट, काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांनी मतदानप्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ आणि दुबार मतदानाच्या तक्रारीवरून त्यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचे आरोप केले. दुसरीकडे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे, की सर्व तांत्रिक अडचणी त्वरित निवारण्यात आल्या आणि मतदान शांततेने पार पडले. मतदान प्रारंभीच राज्यातील अनेक महापालिकांच्या मतदान केंद्रांवर तांत्रिक अडचणी आल्या. सरकारी यादीतील मतदार नावे लवकर उपलब्ध न होणे, बिघडलेली ईव्हीएम मशीन या तक्रारी सकाळपासून समाजमाध्यमातून समोर आल्या. मतदार आणि निवडणूक नियामकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. नवी मुंबईचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सेंट मेरी हायस्कूल, कोपरखैरणे या मतदान केंद्रावर ७.३० वाजता पोहोचल्यावर नाव न सापडल्याने जवळपास एका तासात दोनवेगवेगळ्या केंद्रांवर फिरावे लागले. अखेरीस तिसऱ्या केंद्रावर त्यांना मतदानाची परवानगी मिळाली. नवी मुंबईतील अनेक मतदारांनीही मतदान केंद्रांवर गोंधळाच्या तक्रारी नोंदवल्या. उमेदवाराचा पर्याय निवडताना बटण दाबल्यावर भाजप उमेदवाराचे चिन्ह लाइट जळत असल्याच्या तक्रारी काहींनी केल्या. दुपारी ३.३० वाजेपर्यंत नवी मुंबईत ४५ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. ५.३० वाजता मतदान संपल्यानंतर हा आकडा ५० टक्क्यांहून अधिक झाल्याचे समजते.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

