मतदान गुलदस्त्यात
मतदान गुलदस्त्यात
- टक्का घसरल्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ ः ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी-निजामपूर या सहा महापालिकांंसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान झाले. सुरुवातीच्या दोन तासांमध्ये मतदारांच्या उत्साहावार मशीन आणि याद्यांच्या गोंधळाचा परिणाम जाणवला. मात्र, दुपारच्या सत्रात मंदावलेले मतदान अचानक सायंकाळच्या अंतिम क्षणात वाढले. सर्वच मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याने टोकण देऊन उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित महापालिकांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. अंतिम आकडेवारी गुलदस्त्यात ठेवत रात्री उशिरा सरासरी अंदाजित टक्केवारी देण्यासही असमर्थता दर्शवण्यात आली आहे. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा टक्केवारीत घट झाली असल्याचा अंदाज आहे.
ठाण्यात टक्क्याला धक्का
ठाणे महापालिकेसाठी सरासरी अंदाजे ५५ ते ५६ टक्के मतदान झाले असल्याचा अंदाज आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५८.०८ टक्के मतदान झाले होते. २००७ च्या तुलनेत गेल्या वेळी मतदानाचा टक्का वाढला होता. मात्र, यंदा हा टक्का घसरला असल्याचे तूर्तास दिसत आहे.
ठाणे महापालिकेतील ३३ प्रभागांच्या १३१ नगरसेवकपदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीच्या रिंगणात ६४१ उमेदवार राहिले. शिवसेना शिंदे गट- ८७, भाजप- ४०, शिवसेना ठाकरे गट- ५३, राष्ट्रवादी अजित पवार गट- ६६, काँग्रेस ६१ अधिक तीन पुरस्कृत, राष्ट्रवादी शरद पवार गट- ६४, मनसे- २३ उमेदवार तर ८६ अपक्ष मैदानात आहेत. ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. कळवा-मुंब्य्रात मात्र दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आहे. सुरुवातीपासून महायुतीच्या बाजूने ही निवडणूक असल्याचे दिसून आले, पण बंडखोर आणि अपक्षांमुळे या निवडणुकीत रंग आला, तर शेवटच्या टप्प्यात ठाकरे बंधूंच्या सभेमुळे रण तापले.
एकंदरीत राजकारणाची समीकरणे बदलण्यासाठी मतदान होईल, अशी अपेक्षा होती, पण मतदारांचा सुरुवातीच्या सत्रामध्ये निरुत्साह पाहण्यास मिळाला. पहिल्या दोन तासांमध्ये अवघे आठ टक्के मतदान झाले. त्यानंतर हळूहळू मतदानाची टक्केवारी पुढे सरकू लागली. साडेअकरापर्यंत १९ टक्के आणि दुपारी दीडपर्यंत ३० टक्के मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत ४४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. साडेपाच आणि त्यानंतर यामध्ये आणखी वाढ झाली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळपर्यंत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये ५४.७५ टक्के, उथळसरमध्ये ६०.६६, कळव्यात ५४.२५. दिवा येथे ५७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. नौपाडा, वर्तकनगर आणि मुंब्य्राची माहिती मिळू शकली नाही.
-------------------
उल्हासनगरात
पहिल्या दोन तासांत अवघे १.९८ टक्के मतदान
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) ः शहरात मतदारांचा उत्साह अपेक्षेप्रमाणे दिसला नाही. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच शुकशुकाट, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्रांचा गोंधळ आणि वारंवार बंद पडणारी ईव्हीएम यंत्रे या साऱ्यांचा फटका थेट मतदानाच्या टक्केवारीला बसल्याचे दिसते. धक्कादायक म्हणजे पहिल्या दोन तासांमध्ये केवळ १.९८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या निवडणुकीत एकूण ४६.४ टक्के मतदान झाले होते. २०१२ मध्ये ४१.९६ टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत यंदाची आकडेवारी समाधानकारक मानली जात आहे.
उल्हासनगर महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतदानात सकाळच्या पहिल्या सत्रात सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत अवघे १.९८ टक्के मतदान झाल्याने राजकीय वर्तुळासह प्रशासनालाही धक्का बसला. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या अत्यल्प होती. काही ठिकाणी मतदार यादीत नाव न सापडल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली, तर काही केंद्रांवर मतदान यंत्रांतील तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली. मतदान केंद्र शोधण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती, तर काही मतदारांनी कंटाळून मतदान न करताच परतण्याचा निर्णय घेतल्याचेही चित्र होते.
यंदा उल्हासनगरमध्ये ७८ जागांसाठी ४३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यासाठी शहरभर ५९६ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मात्र, इतकी व्यापक व्यवस्था असूनही मतदानाचा वेग समाधानकारक राहिला नाही. बाजारपेठांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरमध्ये मतदानाच्या दिवशी संमिश्र वातावरण दिसून आले. अनेक भागांतील बाजारपेठा मतदानाच्या निमित्ताने बंद होत्या. त्यामुळे काही परिसरात शांतता होती. मात्र, काही चौकांत प्रशासनाच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली. विशेषतः पवई चौकात शेजारील मतमोजणी केंद्राबाहेर उभ्या असलेल्या वाहनांमुळे कोंडीचे चित्र पाहायला मिळाले. भाटीया चौक, धर्मवीर आनंद दिघे चौक, व्हिनस चौक आणि शहाड स्थानक परिसरातील बाजारपेठांमध्ये मात्र तुलनेने शांतता होती. दुपारी साडेतीनपर्यंत अवघ्या ३४.८८ टक्क्यांची नोंद झाली होती.
-------------------------
भिवंडीत उशिरापर्यंत मतदान
भिवंडी, (वार्ताहर) ः भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी शहरात तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची विहित वेळ संपल्यानंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने शेवटचे मतदान साडेसहा वाजता पार पडले. गेल्या निवडणुकीत भिवंडी- निजामपूर महापालिकेसाठी ५१ टक्के मतदान झाले होते.
शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत तणावपूर्ण शांततेत हे मतदान झाले. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग एकमध्ये भाजप व कोणार्क यांच्यात दोन हाणामारीच्या घटना घडल्या असून, या घटनांची वेळीच दखल पोलिस यंत्रणेने घेतल्यानंतर दुपारनंतर मतदान सुरळीत पार पडले. मात्र, कोंबडपाडा परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समोरच पैसेवाटप केल्याचा आरोप कोणार्कच्या कार्यकर्त्यांनी केला. सायंकाळपर्यंत प्रभाग एकमध्ये तणावाचे वातावरण पसरले होते.
मतदानाची वेळ संपताच पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्या जमावाची पांगापांग केली. नवी वस्ती येथील मराठी शाळेत ईव्हीएम मशीन तीन वेळा बंद पडल्याने सुमारे दोन तास येथील मतदान ताटकळत बसले होते. अखेर बूथ अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलल्याने दुपारनंतर येथील मतदान सुरळीत झाले. शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी स्वतः भेटी दिल्या, तर शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात असलेल्या चाचा नेहरू विद्यालयात सायंकाळी उशिरा मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांना वेळ संपल्याचे सांगत मातदानापासून रोखल्याचा आरोप मतदारांनी केला.
दरम्यान, भिवंडीमध्ये सकाळी साडेनऊपर्यंत ६.२३ टक्के, तर दुपारी साडेतीनपर्यंत ३८.२१ टक्के मतदान झाले. सायंकाळी यामध्ये आणखी वाढ झाली.
-----------------------
कल्याण-डोंबिवलीत बिनविरोधचा फटका
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठी मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. पहिल्यांदाच चार पॅनेल पद्धतीने कल्याण, डोंबिवलीकर मतदानाला सामोरे जात होते, पण अनेक प्रभागांमध्ये संपूर्ण पॅनेलच बिनविरोध निवडून आल्याने तेथील मतदारांना मतदानच करता आले नाही. परिणामी बिनविरोधचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ४५.६९ टक्के मतदान झाले होते. २००७ च्या तुलनेत गेल्यावेळी मतदानाचा टक्का वाढला होता. यंदा बिनविरोधमुळे यावर परिणाम जाणवणार आहे.
महापालिकेतील ३१ प्रभागांच्या १२२ नगरसेवकपदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, २० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुकीच्या रिंगणात १०२ उमेदवार राहिले. शिवसेना शिंदे गट- ७०, भाजप- ५६, शिवसेना ठाकरे गट- ७१, राष्ट्रवादी अजित पवार गट- २८, काँग्रेस ४०, राष्ट्रवादी शरद पवार गट- ३१, मनसे- ३४ उमेदवार तर ९२ अपक्ष मैदानात आहेत.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये ठराविक जागा सोडल्या, तर दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आहेत.
सुरुवातीपासून महायुतीच्या बाजूने ही निवडणूक असल्याचे दिसून आले, पण मनसे आणि अपक्षांमुळे या निवडणुकीत रंग आला, तर शेवटच्या टप्प्यात ठाकरे गटाची आक्रमकता दिसून आली. तसेच एकमेव असलेल्या पॅनेल २९ मध्ये शिंदे गट व भाजप समोरासमोर आल्याने व येथील वाद विकोपाला गेल्याने रण तापले.
एकंदरीत राजकारणाची समीकरणे बदलण्यासाठी मतदान होईल, अशी अपेक्षा होती, पण मतदारांचा सुरुवातीच्या सत्रामध्ये निरुत्साह पाहण्यास मिळाला. पहिल्या दोन तासांमध्ये अवघे ७.४७ टक्के मतदान झाले. त्यानंतर हळूहळू मतदानाची टक्केवारी पुढे सरकू लागली. साडेअकरापर्यंत १७ टक्के आणि दुपारी दीडपर्यंत २९ टक्के मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत ४० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. साडेपाच आणि त्यानंतर यामध्ये आणखी वाढ झाली असून, शेवटच्या चरणात सरासरी -- मतदान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ठळक घटना
कल्याण पूर्वेत पॅनेल १८ मध्ये मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले. मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. बिनविरोध उमेदवार निवडून आल्याने मतदारांमध्ये निरुत्साहाचे वातावरण होते. कल्याण पूर्व तसेच मांडा टिटवाळा येथे बोगस मतदारांनी आधीच मतदान केल्यामुळे काही मतदारांना आपला हक्क बजावता आला नाही.
अपक्ष, ठाकरे गट उमेदवारांसमोरील बटण चालत नसल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, या सर्व गोंधळामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

