नवी मुंबईत भाजपची मुसंडी
नवी मुंबईत भाजपची मुसंडी
६६ जागांवर विजय, शिंदे सेनेकडे ४२ जागा
ठाकरे गटाला २, मनसेने खाते उघडले
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या लढाईत अखेर भाजपची सरशी झाली. १११ जागांपैकी वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ६६ जागांवर विजय मिळवला. तर भाजपचा सामना करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाला ४२ जागा जिंकता आल्या. नाईक आणि शिंदे असा थेट सामना पाहायला मिळाला. शिवसेना ठाकरे गटाने दोन जागा जिंकल्या असून मनसेला पहिल्यांदा खाते उघडता आले आहे. या दोघांच्या लढाईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अजित पवार गटाचा अक्षरशः धुव्वा उडाला. या तीनही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही.
शिवसेना आणि भाजप महायुती दुभंगल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत रंगत आली. नाईकांच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी एरवी शिवसेनेच्या शिंदे गटाने दंड थोपटले होते. महाविकास आघाडीत बिघाडी होऊन शिवसेना आणि मनसे वेगळे लढल्यामुळे त्यांना याचा थोडासा का होईना फायदा झाला; परंतु शरद पवार, अजित पवार आणि काँग्रेस गटाला भोपळाही फोडता आला नाही. गणेश नाईक यांच्या नियोजनबद्ध प्रचार आणि विचार करून उमेदवारांचे पॅनेल उभे केल्यामुळे शिवसेनेला मागे टाकता आले. नाईकांनी फारसे नवीन चेहरे न देता जुन्या नगरसेवकांवर विश्वास ठेवून त्यांना संधी देत निवडून आणले. ऐरोलीत माजी महापौर सुधाकर सोनवणे यांची पत्नी रंजना सोनवणे यांच्यासह चार जणांचे पॅनेल निवडून आले; परंतु या ठिकाणी दिघ्यात गवते कुटुंबीयांना विजय मिळवता आला नाही. बेलापूरमध्ये माजी महापौर जे. डी. सुतार यांनी त्यांचे पॅनेल जिंकून आणले. तर सभागृह नेते रवींद्र इथापे यांनीही पॅनेल निवडून आणून बेलापूरमध्ये भाजपला ताकद दिली. जागोजागी केलेला प्रचार आणि रॅलीमुळे गणेश नाईकांनी भाजपच्या तब्बल ६६ जागा निवडून आणून आपला बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध करून दाखवले. तर शिवसेनेला या वेळी नाईकांचा गड खालसा करण्याची संधी होती; मात्र काही जागांवर चुकलेले प्रचाराचे नियोजन, घराणेशाहीमुळे दिलेले चुकीचे उमेदवार, एकमेकांमध्ये असलेल्या असमन्वयाचा फटका शिवसेनेला बसल्याने ४२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. ऐरोलीत विजय चौगुले यांचे पूर्ण पॅनेल, वाशीत जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आणि तुर्भेत सुरेश कुलकर्णी यांनी पॅनेलचे सर्व सदस्य निवडून आल्यामुळे शिवसेनेला ४२चा आकडा गाठता आला; परंतु येणाऱ्या जागांवर घरातील एकापेक्षा अधिक उमेदवारी दिल्याचा शिवसेनेला चांगला फटका बसला. जुईनगरमधून विशाल ससाणे आणि विशाल विचारे या दोघांनी विजय मिळवून शिवसेना ठाकरे गटाला जिवंत ठेवण्याचे काम केले. तर मनसेला अभिजित देसाई यांच्या रूपाने पहिल्यांदा खाते खोलता आले; परंतु या निवडणुकीत नाईकांनी पुन्हा एकदा त्यांना भाजपने दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेत आपला करिष्मा कायम ठेवला.
------------------------------------
एकूण जागा - १११
भाजप - ६६
शिवसेना - ४२
उबाठा - २
मनसे - १
----------------------------------------------------
जनतेने भाजपला कौल देऊन वनमंत्री गणेश नाईक यांचे नेतृत्व पुन्हा एकदा स्विकारले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी दबावतंत्र वापरून पक्षप्रवेश करून घेतले. तसेच भाजपवरदेखील तीच पद्धत वापरून अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र जनतेने त्यांना पुरते ओळखले आहे.
- संजीव नाईक, नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

