मिरा भाईंदर मध्ये भाजपचा झंझावात

मिरा भाईंदर मध्ये भाजपचा झंझावात

Published on

मिरा-भाईंदरमध्ये भाजपचा झंझावात

महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेत सत्तेसाठी प्रमुख दावेदार असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पानिपत करत भाजपने पुन्हा एकदा महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. ९५ पैकी भाजपने ७८, काँग्रेसने १३ जागा मिळवल्या असून, शिवसेनेला अवघ्या तीन जागा मिळाल्याने त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. याव्यतिरिक्त भाजपचा एक बंडखोर माजी नगरसेवक अपक्ष म्हणून विजयी झाला आहे.

शिवसेनेने या वेळी भाजपसमोर जबरदस्त आव्हान उभे केले होते. कोणत्याही परिस्थितीत भाजपला बहुमत मिळू दयायचे नाही, यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वस्व पणाला लावले होते. मात्र, शिवसेनेला धोबीपछाड देत भाजपने आपल्या सर्व जागा, तर जिंकल्याच शिवाय शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही जागा जिंकल्या. त्यामुळे ५० पारचा नारा देणाऱ्या शिवसेनेला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

मतमोजणीला सकाळी उशीर
मिरा-भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी मतमोजणीला सकाळी अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरुवात झाली. पहिला निकाल सुमारे साडेअकराच्या सुमारास जाहीर झाला. जसजसे निकाल येऊ लागले, तसे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले. विशेषकरून शिवसेनेचे बालेकिल्ले ढासळल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आणखी जोश निर्माण झाला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर विजय साजरा करू लागले. दुसरीकडे धक्कादायक निकाल येऊ लागल्याने शिवसेनेच्या गोटात मात्र स्मशान शांतता पसरली. निवडणूक आयोगाचे काम मात्र अत्यंत संथ गतीने सुरू होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती, तसेच विजयी झाल्यानंतरही उमेदवारांची बराच वेळ अधिकृत घोषणा केली जात नव्हती.

भाजपची ७८ जागांवर झेप
२०१७ मध्ये एकत्रित शिवसेनेने ९५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. त्यातील बहुतांश नगरसेवक शिंदे गटात गेले होते. मात्र, त्यापैकी शिवसेनेला अवघ्या तीन जागा राखण्यात यश आले. दुसरीकडे भाजपने मात्र गेल्यावेळच्या ६१ जागांवरून ७८ जागांवर झेप घेत महापालिकेत पुन्हा एकदा विक्रमी एकहाती सत्ता स्थापन केली. भाजपने २४ पैकी तब्बल १८ प्रभागांतील सर्व चार जागा जिंकल्या, हे या निकालाचे वैशिष्ट्य होय.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का
मुंबई व ठाण्यात भाजप शिवसेनेत युती झालेली असताना मिरा-भाईंदरमध्ये मात्र युती होऊ शकली नव्हती. शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपला पुन्हा एकदा एकहाती सत्ता स्थापन करायची होती. त्यामुळेच शिवसेनेने पुढे केलेला युतीसाठीचा हात भाजपने झिडकारला होता. परिणामी भाजपला निवडणुकीत पाणी पाजायचा शिवसेनेने पण केला होता. मात्र, त्यात शिवसेना सपशेल अपयशी तर ठरलीच मात्र स्वतःच्या जागादेखील ती वाचवू शकली नाही. हा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेच्या नऊ माजी नगरसेवकांचा पराभव
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर लढत असलेला प्रभाग १६ भाजपने प्रतिष्ठेचा केला होता. भोईर यांना या वेळी हरवणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले होते आणि ते प्रत्यक्षात उतरवत भाजपने भोईर यांना त्यांच्या पत्नीसह हरवले. या निवडणुकीत शिवसेनेच्या नऊ माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेच्या आणखी एक उमेदवार माजी महापौर व माजी आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या कन्या कॅटलीन परेरा त्याचप्रमाणे माजी उपमहापौर यांचा पराभवही शिवसेनेसाठी न पचणारा होता.

खातेही उघडता आले नाही
काँग्रेसने मात्र निवडणुकीत बरी कामगिरी केली. काँग्रेसने आपल्या गेल्यावेळच्या १२ जागा तर राखल्याच, शिवाय उत्तनमध्येही आपले खाते उघडून त्या ठिकाणी एक जागा जिंकली. उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार यांची ताकद मुळातच कमी असल्याने त्यांना खातेही उघडता आले नाही.

भाजपचे बंडखोर भुईसपाट
भाजपच्या नऊ माजी नगरसेवकानी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली होती. त्यातील केवळ अनिल भोसले अपक्ष म्हणून विजयी झाले. उर्वरित आठ माजी नगरसेवकांचे बंड अयशस्वी ठरले.

२२ माजी नगरसेवक पराभूत
या निवडणुकीत तब्बल २२ माजी नगरसेवकांना मतदारांनी घरी बसवले. त्यात शिवसेनेचे १०, ठाकरे गटाचा १, काँग्रेसचे २ बंडखोर, भाजपची १ व ८ बंडखोर यांचा समावेश आहे.

दोन नगरसेवकांना अल्प आघाडी
प्रभाग ३ मध्ये भाजपचे तरुण शर्मा १५ मतांनी, तर प्रभाग १० मध्ये भाजपच्या कविता त्रिपाठी अवघ्या आठ मतांनी विजयी झाल्या.
-----------------
भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली व जनतेनेही विकासाला साथ दिली. अन्य पक्षांनी मात्र विकासापेक्षा अन्य गोष्टींना जास्त महत्त्व दिले. जनतेने भाजपला पुन्हा एकदा साथ दिली आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरला प्रगतिपथावर नेऊ, असा विश्वास जनतेला देत आहोत.
- नरेंद्र मेहता, भाजप आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com