नाईकांच्या करिष्मापुढे शिवसेनेच्या घोषणा फिक्या
नाईकांच्या करिष्म्यापुढे शिवसेनेच्या घोषणा फिक्या
घराणेशाहीचा शिवसेनेला फटका
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : नवी मुंबई महापालिकेवर गेली ३० वर्षे असलेली निर्विवाद सत्ता कायम ठेवण्यात पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांना यश आले आहे. यंदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नाईकांना कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न केला खरा; पण प्रस्थापित नगरसेवकांच्या घरात दोनपेक्षा अधिक उमेदवारी देण्याची भूमिका शिवसेनेच्या अंगलट आली. चुकीचे उमेदवार देऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराला गृहीत धरल्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा नवी मुंबई महापालिकेवरील सत्तेने हुलकावणी दिली.
महापालिका निवडणूक घोषित होण्याआधीच नवी मुंबईत शिंदे समर्थक आणि नाईक समर्थक यांच्यात मनभेद झाले होते. नाईकांविरोधात विधानसभेला प्रचार केलेल्यांना पक्षप्रवेश केल्यामुळे आणि एकमेकांविरोधात केलेल्या आरोपांमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढला होता. तोच दुरावा महायुती दुभंगण्यासाठी कारणीभूत ठरला. नवी मुंबई शहरात तसे महायुती एकत्र लढल्यास विरोधकच नव्हते; परंतु एकमेकांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपला शिवसेनेच्या रूपाने भक्कम विरोधक मिळाला. अगदी सुरुवातीपासूनच भाजपने गणेश नाईक यांना उमेदवार निवडीपासून ते प्रचारापर्यंतचे सर्व अधिकार बहाल केले होते. त्यामुळे नाईक यांनी बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघात अचूक उमेदवारांची निवड केली. शहराचा विकास, नवीन पाण्याची योजना, २० वर्षे न वाढणारे मालमत्ता कर, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्वसन आदी मुद्यांवर अतिशय शांत डोक्याने प्रचार केला. नवीन चेहऱ्यांना अधिक संधी देण्याचा मोह न करता जुने आणि प्रस्थापित नगरसेवकांना पुन्हा संधी देऊन नाईकांनी राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडवले.
ऐरोलीत फारसे नुकसान होण्यासारखी परिस्थिती असतानाही नाईकांचे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी चार जणांचे पॅनेल निवडून आणून दाखवले. तर शिवसेना ठाकरे पक्षातून शिवसेनेत आलेल्या माजी नगरसेवक एम. के. मढवी कुटुंबीयांना चार जागा देऊनही नाईकांच्या भाजप उमेदवारापुढे पराभव पत्कारावा लागला. शिवसेनेत नेमक्या या उलट काम करीत एकाच घरात अधिक उमेदवारी दिली. कोपरखैरणे येथे दुसरा स्थानिक नगरसेवक उमेदवार म्हणून शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक असताना माजी नगरसेवक शिवराम पाटील हे आणि त्यांची पत्नी अनिता पाटील नगरसेवक असताना आणखी एक उमेदवारी बहाल केली. सानपाडा येथे स्थानिक नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि पत्नी कोमल वास्कर हे दोघे नगरसेवक असताना आपल्या घरात तिसरी उमेदवारी घेण्याचा हट्ट वास्कर दाम्पत्याला आत्मघातकी ठरला. तुर्भेचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनीही स्वतःच्या घरात दोनपेक्षा अधिक उमेदवारी असताना १४ गावांमध्ये त्यांचा पुत्र महेश कुलकर्णी याला उमेदवारी देऊन स्थानिक ग्रामस्थांचा रोष ओढवून घेतला.
जुईनगरमध्ये प्रभाग क्रमांक २२ येथे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक रंगनाथ औटी यांनी हट्टाने पत्नी शशिकला औटी यांना उमेदवारी मागून घेतली; परंतु ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाडण्याच्या नादात औटी स्वतःची येणारी जागा गमावून बसले. शिवसेना आणि भाजपच्या वादात महाविकास आघाडीचे उमेदवार देण्याची परिस्थिती काही प्रभागात होती; परंतु काँग्रेसने दिलेल्या उमेदवारांच्या प्रभागात ठाकरे गटानेही उमेदवार घोषित केल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट बाहेर पडून वेगळा संसार थाटला. काँग्रेसच्या स्वमग्न नेत्यांनी पक्षापेक्षा स्वतःच्या आणि घरातील उमेदवारीला प्राधान्य दिल्यामुळे भोपळाही फोडता आला नाही. उलट महाविकास आघाडीच्या मागे न लागता निवडणूक लढवली असती तर शिरवणे येथे माजी प्रवक्ते रवींद्र सावंत यांना शिवसेनेत जाण्याची वेळ आली नसती. स्वतःला महत्त्व देण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी, जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या पत्नी सीता दळवी यांना पराभवाचा सामना करावा लागला. ठाकरे गटातून विशाल ससाणे यांनी दुसऱ्यांदा आणि विशाल विचारे यांनी पहिल्यांदा निवडून येत पक्षाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु एकूणच नवी मुंबईत नाईकांचा विजयी रथ रोखण्याची आलेली नामी संधी शिवसेनेने पुन्हा नियोजनशून्यता, घराणेशाही चुकलेल्या भूमिकेत घालवली.
़़़़़़़़़
कोट
नवी मुंबई महापालिका निवडणुकीतील अभूतपूर्व विजयाचे श्रेय जनतेला देत आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. निवडणुकीत विरोधकांवर केलेल्या टीकेनंतर आता वैर संपले आहे. टीकेची पुनरावृत्ती करायची नाही. उद्यापासून जोमात काम करणार आहोत. शहरातील पुनर्विकासाला वेग देणार आहे.
- गणेश नाईक, वनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

