हुतात्म्यांना जासई-पागोटे येथे भावपूर्ण अभिवादन

हुतात्म्यांना जासई-पागोटे येथे भावपूर्ण अभिवादन

Published on

हुतात्म्यांना जासई-पागोटे येथे भावपूर्ण अभिवादन
१९८४ च्या गौरवशाली शेतकरी लढ्यातील बलिदानाचे स्मरण
उरण, ता. १७ (वार्ताहर) : शेतकरी, भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी १९८४ रोजी झालेल्या ऐतिहासिक आणि देशभर गाजलेल्या शेतकरी आंदोलनात प्राणार्पण केलेल्या पाच हुतात्म्यांना जासई व पागोटे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जासई ग्रामस्थांच्या वतीने १६ जानेवारी रोजी जासई येथे, तर पागोटे ग्रामस्थांच्या वतीने १७ जानेवारी रोजी पागोटे येथे हुतात्मा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी एनसीसीच्या जवानांच्या वतीने हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.
नवी मुंबई उभारणीसाठी सिडकोकडून कवडीमोल दराने जमिनी संपादन करण्याच्या निर्णयाला विरोध करत, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी जानेवारी १९८४ मध्ये दास्तान व नवघर परिसरात शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन छेडले होते. लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी एकत्र आले असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला. या अमानुष गोळीबारात नामदेव शंकर घरत (चिर्ले), रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम), कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील आणि केशव महादेव पाटील (पागोटे) यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या बलिदानाने महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळाली. या घटनेला चार दशके उलटून गेली असली तरी आजही शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचे पुनर्वसन, रोजगार, तसेच हक्कांचे प्रश्न जैसे थे असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे, तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे, हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत विविध वक्त्यांनी आपल्या भाषणांतून मांडले.
शुक्रवारी (ता. १६) जासई येथील हुतात्मा स्मारकात झालेल्या सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्यास माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, नगराध्यक्षा भावना घाणेकर, राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत, माजी पनवेल नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जेएनपीए कामगार विश्वस्त दिनेश पाटील, दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com