शिवसेनेला विरोधी पक्षावर बसावे लागणार

शिवसेनेला विरोधी पक्षावर बसावे लागणार

Published on

शिवसेना विरोधी बाकावर!
नवी मुंबईत नवा चेहरा देणार की जुनाच पेच?
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेची हुलकावणी मिळालेल्या शिवसेनेला पुन्हा विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागणार आहे; परंतु यंदा राज्यात पक्षाचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे शिवसेनेत अधिक ताकद असणार आहे. शिवसेनेतून विरोधी पक्षनेता पदाकरिता कोण दावा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दरवेळी तोच चेहरा देण्यापेक्षा यंदा तरी नवीन चेहरा शिवसेनेने देऊन एक नवा पायंडा पाडावा, अशी चर्चा पक्षाअंतर्गत होत आहे.
महापालिकेच्या १११ जागांसाठी शिवसेनेने (शिंदे गट) सर्वतोपरी तयारी करून १०९ उमेदवार लढवले. त्यापैकी शिवसेनेचे ४२ उमेदवार निवडून आले. सर्वाधिक नगरसेवक ऐरोली मतदारसंघातून निवडून आले. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून २८ जागांपैकी २० नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडायची संधी ऐरोलीला मिळणार असल्याची शक्यता आहे; परंतु विरोधी पक्षनेतेपद ज्येष्ठ नगरसेवकास देण्याऐवजी नवा चेहरा देण्याची मागणी पक्षांअतर्गत होत आहे. तो चेहरा तरुण असल्यास शिवसेनेच्या पुढच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात १४ नगरसेवक शिवसेनेचे आले आहेत. आतापर्यंत पुरुष नगरसेवक विरोधी पक्षनेता म्हणून बसले आहेत. परंतु महिला नगरसेविकांमधूनही विरोधी पक्षनेता देण्याचा पहिला पायंडा शिवसेनेच्या सरोज पाटील यांच्या रूपाने पाडला होता. तसेच आता तरुण नगरसेवकांमधून विरोधी पक्षनेता दिल्यास शिवसेना सर्वांपुढे नवा आदर्श ठेवू शकते; परंतु तो नगरसेवक तेवढाच राजकीय प्रगल्भता असणारा हवा आहे.
------------------------------------
आतापर्यंत झालेले विरोधी पक्षनेते
नवी मुंबई महापालिकेत १९९४ पासून काँग्रेस पक्षाने पहिला विरोधी पक्षनेता म्हणून डी. आर पाटील, बेलापूरचे सरपंच असणारे ज्येष्ठ नेते पंढरीनाथ पाटील, रमाकांत म्हात्रे, नामदेव भगत, दिलीप घोडेकर, दशरथ भगत, मनोज हळदणकर, विजयानंद माने, सरोज पाटील त्यांच्यानंतर विजय चौगुले हे शेवटचे विरोधी पक्षनेते ठरले.
-------------------------------------
विरोधी पक्षानेतेपदाकरिता यांच्यात चुरस
विरोधी पक्षनेतेपदासाठी मनोज हळदणकर, विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, किशोर पाटकर, शिवराम पाटील हे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून आहेत. विजय चौगुले यांना विरोधी पक्षनेते म्हणून पद मिळण्याची संधी आहे. त्यांनी दोन पॅनेल निवडून आणली आहेत. बेलापूर मतदारसंघात विरोधी पक्षनेते म्हणून नवीन पर्याय अभ्यासू नगरसेवक म्हणून किशोर पाटकर यांच्या रूपाने होऊ शकतो. यूडीसीपीआर आणि पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने त्यांचा अभ्यास चांगला आहे. तर नवीन आणि तरुण चेहरा म्हणून अनिकेत म्हात्रे हा चांगला पर्याय आहे. अनिकेत म्हात्रे यांनी ऐरोलीत चार जणांचे पॅनेल जिंकून आणले आहे. महिलांमध्ये माजी उपमहपौर मंदाकिनी म्हात्रे आणि सरोज पाटील हा पर्यायही शिवसेनेकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com