काँग्रेस-वंचित आघाडीचा लातूर पॅटर्न

काँग्रेस-वंचित आघाडीचा लातूर पॅटर्न

Published on

काँग्रेस-वंचितचा ‘लातूर पॅटर्न’
राज्यात नव्या समीकरणांची साखरपेरणी
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई, लातूर आणि नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली. लातूर आणि नांदेडमध्ये दोन्ही पक्षांचे नेते एकदिलाने लढल्याने या ठिकाणी चांगले यश मिळाले. लातूरमध्ये तर काँग्रेस-वंचितने एकहाती सत्ता आणली. त्यामुळे राज्यात सर्वत्र काँग्रेस-वंचित युतीचा ‘लातूर पॅटर्न’ राबविला जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन दशकांपासून काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात अविश्वासाचे संबंध राहिले; मात्र महापालिका निवडणुकीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेत दोन्ही पक्षांत युती घडवली. कुठल्याही परिस्थितीत वंचितला सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छाशक्ती होती. त्यामुळे २५ वर्षांनंतर लातूर, नांदेड आणि मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र आले. मुंबईचा अपवाद वगळता दोन्ही ठिकाणी त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसले.
लातूरमध्ये काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी दोन्ही पक्षांतील युती केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात जमिनीवर उतरवली. वंचितला सोडलेल्या सर्वच्या सर्व पाच जागा निवडून आणण्याची त्यांनी जाहीर हमी दिली. त्यामुळे आंबेडकर कुटुंबीय सक्रियपणे प्रचारात उतरल्याचे दिसले. या एकजुटीचा परिणाम म्हणजे लातूरमध्ये ७० पैकी ४७ जागा जिंकून देशमुख यांनी एकहाती सत्ता खेचून आणली. नांदेडमध्ये दोन्ही पक्षांना चांगले यश मिळाले. या निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांनी या युतीबद्दल सकारात्मक संकेत दिले. राज्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-वंचित युतीचा ‘लातूर पॅटर्न’ राबविला जाऊ शकतो.
---
मुंबईत युती फसली
लातूर, नांदेडमध्ये युती यशस्वी झाली; मात्र मुंबई महापालिकेत ती फसली. मुळात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपली ताकद वापरून ही युती घडवून आणली. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाने ही युती प्रत्यक्षात उतरवण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांना फारसा फायदा झाला नाही. काँग्रेसच्या जागा ३१ वरून २४ वर आल्या, तर वंचितला एकाही जागेवर यश मिळाले नाही.
---
पुढे काय?
काँग्रेस-वंचित युतीतून काँग्रेसला पुढच्या राजकीय समीकरणाची साखरपेरणी करायची आहे. महाविकास आघाडीत फूट पडल्यानंतर शरद पवार हे अजित पवारांसोबत जुळवून घेत आहेत. ठाकरे बंधूंनी वेगळा मार्ग चोखाळला आहे. त्यामुळे भविष्यात पर्याय म्हणून काँग्रेस-वंचितकडे पाहिले जात आहे. त्यामुळे ‘लातूर पॅटर्न’ कशा पद्धतीने पुढे जाणार, त्याकडे दोन्ही पक्षांची दीर्घकालीन वाटचाल अधोरेखित होणार आहे.
...
मी हा ‘लातूर पॅटर्न’ नव्हे, तर ‘गांधी-आंबेडकर पॅटर्न’ मानतो. या दोन्ही महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जाणे, हाच काँग्रेसचा विचार आहे. तो राज्यभरात नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com