२१ जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल विशेष मोहीम 
१२,४२० रुग्ण

२१ जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल विशेष मोहीम १२,४२० रुग्ण

Published on

‘सिकलसेल’ नियंत्रणासाठी मोहीम
राज्यात एक कोटी पाच लाखांहून अधिक जणांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात आल्या असून, २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण एक कोटी पाच लाख ८६ हजार ७३३ सोल्युबिलिटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १२,४२० सिकलसेलग्रस्त रुग्ण, तर १,२४,२७५ सिकलसेल वाहक आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ सिकलसेल विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहणार नाही, असे नियोजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभर या मोहिमेची सविस्तर पूर्वतयारी करण्यात आली आहे. विशेषत: आदिवासी आणि दुर्गम भागांतील नागरिक तपासणीपासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन केले आहे.
सिकलसेल आजाराचे लवकर निदान होणे, रुग्णांना वेळेत योग्य उपचार आणि आवश्यक संदर्भसेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सिकलसेल आजार आनुवंशिक असून, रक्तपेशींच्या रचनेतील बदलामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तीव्र वेदना, अवयवांचे नुकसान आणि गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. वेळेवर तपासणी आणि उपचार झाल्यास या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात २००८ पासून सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशिम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि हिंगोली या २१ जिल्ह्यांचा या कार्यक्रमात समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये तपासणी, निदान, उपचार आणि जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे.

एकूण सोल्युबिलिटी चाचण्या : एक कोटी पाच लाख ८६ हजार ७३३
सिकलसेलग्रस्त रुग्ण : १२,४२०
सिकलसेल वाहक : १,२४,२७५

मोहिमेअंतर्गत उपलब्ध सुविधा

- मोफत सोल्युबिलिटी चाचणी
- इलेक्ट्रोफोरेसिस व एचपीएलसी तपासणी
- रुग्णांना मोफत औषधे
- नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन
- गरजेनुसार रक्त संक्रमण
- टेलिमेडिसिनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला


जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी
राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात सिकलसेल तपासणी करून घ्यावी. तपासणी, उपचार आणि सल्ल्यासाठी आशा स्वयंसेविकांशी संपर्क साधावा किंवा आरोग्य सल्ल्यासाठी १०४ क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

फोटो - 665

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com