सरकारी रुग्णालयात प्रथमच यशस्वी ''भ्रूण'' निर्मिती

सरकारी रुग्णालयात प्रथमच यशस्वी ''भ्रूण'' निर्मिती

Published on

सरकारी रुग्णालयात प्रथमच यशस्वी ‘भ्रूण’निर्मिती
कामा रुग्णालयाने घडवला इतिहास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : विवाहानंतर अनेक वर्षे अपत्यप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या सामान्य दाम्पत्यांसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. मुंबईच्या कामा अँड आल्बलेस रुग्णालयाने राज्याच्या वैद्यकीय इतिहासात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रुग्णालयाच्या आयव्हीएफ प्रयोगशाळेत यशस्वीपणे भ्रूणनिर्मिती करण्यात आली असून, अशी कामगिरी करणारे हे महाराष्ट्रातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये आयव्हीएफ उपचाराचा खर्च लाखांच्या घरात असतो, जो सामान्य किंवा अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असतो; मात्र कामा रुग्णालयात ही एआरटी (आसिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी) सुविधा आता अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये या रुग्णालयाला एआरटी बँक स्थापन करण्याची मान्यता मिळाली होती. आता येथे दुसऱ्या टप्प्यातील अत्याधुनिक सेवाही सुरू झाल्या आहेत.

कर्करोग रुग्णांसाठीही वरदान
सुविधेचा फायदा केवळ अपत्यहीन दाम्पत्यांनाच नाही, तर कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांनाही होणार आहे. केमोथेरपी किंवा रेडिएशनमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी हे रुग्ण उपचारापूर्वी आपली प्रजनन क्षमता येथे सुरक्षित ठेवू शकतील, जेणेकरून भविष्यात त्यांना पालक होण्याची संधी मिळेल.

कशी होते ही प्रक्रिया?
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी प्रक्रियेबाबत अधिक माहिती दिली.
१. पहिला टप्पा : महिलेची सविस्तर तपासणी करून अंडाशय किंवा फॅलोपियन ट्यूबमधील अडथळे औषधोपचाराने दूर केले जातात. अनेकदा यामुळे नैसर्गिक गर्भधारणा शक्य होते.
२. दुसरा टप्पा : नैसर्गिकरीत्या यश न मिळाल्यास आयव्हीएफ प्रक्रिया राबवली जाते. यात प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून तो महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो, ज्याला सर्वसामान्य भाषेत ‘टेस्ट ट्यूब बेबी’ म्हटले जाते.

मिळणाऱ्या अत्याधुनिक सुविधा
आयव्हीएफ आणि आयसीएसआय
डोनर स्पर्म आणि डोनर एग
क्रायोप्रिझर्वेशन (शुक्राणू व अंडाणू साठवणूक)

ठळक वैशिष्ट्ये
कमी खर्च : खासगीतील लाखोंचा खर्च वाचणार
सरकारी पुढाकार : राज्यातील अशा प्रकारची पहिलीच अत्याधुनिक लॅब
दुर्गम भागातील लाभ : ग्रामीण भागातील रुग्णांनाही मुंबईत उपचार मिळणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com