महापौरपदासाठी रण पेटणार

महापौरपदासाठी रण पेटणार

Published on

महापौरपदासाठी रण पेटणार
ठाण्यात भाजपचा दावा; कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात पेच; महायुतीतच चढाओढ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली असताना आता महापौरपदासाठी जबरदस्त मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोनच पक्ष प्रमुख दावेदार म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे सत्तेचे तीळगूळ चाखण्यासाठी महापौर आणि स्थायी समिती या दोन प्रमुख पदांवर आपल्या पक्षाची वर्णी लागावी, यासाठी या पक्षांमध्ये कमालीच्या पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने किमान दोन वर्षांसाठी महापौर पदाची मागणी केली आहे. कल्याण- डोंबिवलीतही युती म्हणून निवडणूक लढवणाऱ्या या दोन पक्षांमध्ये महापौरपदासाठी चुरस लागली आहे. उल्हासनगरात वंचितच्या मदतीने शिंदे गटाने महापौरपद खेचण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे या काटाकटीत कुणाचा पतंग उंच उडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यातील २९ महापालिकांची रणधुमाळी नुकतीच संपली आहे. काही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुती एकत्र लढली. त्या सर्वच ठिकाणी महायुतीला चांगले यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेतही महायुतीला काठावर यश मिळाले आहे; मात्र ८९ जागा जिंकूनही भाजपला आपला महापौर बनवण्यासाठी शिंदे गटाची मदत लागणार आहे. दरम्यान, शिंदे गटाने आपले नगरसेवक नजरकैदेत ठेवून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा दबाव खोडून काढण्यासाठी आता ठाण्यातील भाजप कामाला लागली आहे. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे ७५ नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी लागणाऱ्या ६६च्या संख्याबळापेक्षा शिंदे गटाकडे नऊ नगरसेवक जास्तीचे आहेत. अशावेळी आपल्या पदरात काय पडणार, ही चिंता भाजपला सतावू लागली आहे. महायुतीत लढलेल्या कल्याण-डोंबिवलीतही हाच गुंता आहे.

कल्याण-डोंबिवलीत २०१७ प्रमाणेच शिवसेना-भाजपला यश मिळाले आहे. मात्र त्या वेळी हे दोन्ही पक्ष विरोधात लढले होते. आता महायुती म्हणून एकत्र आले होते. भाजपने येथे आपले सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून महापौर बसवण्याचे मनसुबे आखले होते, पण शिंदे सेनेने ते उधळून लावले. घोडेबाजारातही भाजपची सरशी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वरकरणी महायुतीचाच महापौर बसणार असे हे दोन्ही पक्ष बोलत असले तरी आपल्याच पक्षाचा महापौर बनावा, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे येथे खेळ अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे उल्हासनगरात भाजपने ३७ जागा जिंकल्या आहेत. शिंदे गटाला ३६ जागा मिळाल्या आहेत; मात्र सत्ता स्थापनेसाठी असलेली मॅजिक फिगर या दोघांकडे नाही. यामध्ये वंचित किंगमेकर ठरणार असून, सध्यातरी त्यांचे पारडे शिंदेशाहीकडे झुकल्याचे दिसते.

ठाण्यात टाकला पहिला डाव
भाजपचे ठाण्यात २८ नगरसेवक निवडून आले आहेत. शिळ ते वडवलीपर्यंत भाजप पोहोचली आहे, अशी बॅनरबाजी संपूर्ण शहरात केली गेली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपने पत्रकार परिषद घेत मानाचे स्थान मिळावे, यासाठी आग्रह धरला होता. पण मुंबईत खलबते सुरू असल्याने आणि जिल्ह्यातील इतर महापालिकांमध्ये भाजपला दुय्यम स्थान मिळत असल्याचे पाहत ठाण्यात भाजपने आता थेट दोन वर्षे महापौरपदाची मागणी केली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी हा डाव टाकला आहे. भाजपचा शहरात १०० टक्के स्ट्राईक रेट असून, महायुतीत कमी जागा घेऊनही जास्तीचे नगरसेवक निवडून आणल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे मानाचे महापौर पद भाजपला मिळावे आणि ठाणे महापालिकेवर कमळ फुलवावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. या मागणीमुळे शिवसेना शिंदे गटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.

निर्णय वरिष्ठांच्या कोर्टात
ठाण्यात भाजपने दोन वर्षांसाठी महापौर पद द्या अन्यथा विरोधी बाकावर बसणार, अशी तयारी दर्शविली आहे. यावर शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता असली तरी त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवली असून सत्तेत दोन्ही पक्ष असावेत, असे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र याविषयी अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com