कोपरखैरणेत बेघरांचा वाढता घरोबा
कोपरखैरणेत बेघरांचा वाढता घरोबा
स्थानक परिसरात वाढते अस्वच्छतेचे साम्राज्य, प्रशासनाचे अपयश
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात दिवसेंदिवस बकालपणा आणि अस्वच्छतेचा प्रसार वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. स्थानकाजवळील फुटपाथ, मोकळ्या जागा आणि रिक्षा स्टॅन्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर बेघर व भिकाऱ्यांनी बस्तान मांडले आहे. फुटपाथवरच संसार थाटलेल्या या व्यक्तींमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांसह स्थानक परिसरातील नागरिक मोठ्या गैरसोयीला सामोरे जात आहेत.
निवडणुकीपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनेक बेघरांना हटविले होते; मात्र निवडणूक धामधुमीत अधिकारी निवडणूक कामात गुंतल्याने कारवाई मंदावली आणि त्याचा फायदा घेऊन बेघर पुन्हा स्थानक परिसरात वास्तव्यास आले आहेत. सिडको व महापालिकेकडून शहर सुशोभीकरणासाठी भिंती रंगवल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष परिसराची अस्वच्छता दुर्लक्षित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रात्रीच्या वेळी बेघरांकडून होणारे भांडणे, अश्लील वर्तन आणि गोंधळामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी येथून जाण्यास घाबरतात. तिकीटघराजवळ बसून प्रवाशांकडून भीक मागणे आणि खुलेआम स्वयंपाक केल्याने स्वच्छता आणखी बिकट झाली आहे. घणसोली येथील महापालिकेच्या निवारा केंद्राची सुविधा असूनही बेघर तेथे जाण्यास टाळाटाळ करतात, ज्यामुळे प्रशासनास मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
चौकट
रिक्षा स्टॅन्ड परिसरातील अतिक्रमणाचा कहर
स्थानकाबाहेरील रिक्षा स्टॅन्डजवळील पदपथ आणि मोकळ्या जागेत भिकाऱ्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. वाहनधारकांना व प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो, गर्दी वाढल्याने अपघाताचा धोकाही वाढतो. पसरलेला कचरा, चादर-धोतरं, खुले स्वयंपाक आणि गोंधळामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रवाशांसाठी हे ठिकाण सुरक्षित नसल्याचे नागरिक वारंवार सांगतात. प्रशासनाने या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करून प्रवाशांच्या सुरक्षिततेसह स्थानक परिसराची स्वच्छता सुनिश्चित करणे गरजेचे आहे.

