कर्जत-खोपोली महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
कर्जत-खोपोली महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
कशेळे ग्रामस्थांची थेट एमएसआरडीसीच्या मुंबई कार्यालयात धडक
कर्जत, ता. २० (बातमीदार) ः शहापूर ते हाल असा मुरबाड-कर्जत मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (अ) गेल्या तब्बल आठ वर्षांपासून दुरवस्थेत आहे. राज्य सरकार व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षेमुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. कर्जत तालुक्यातील कशेळे गावातून जाणाऱ्या या महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन धोक्यात आले आहे.
कशेळे नाका, पेज नदी पूल, वंजारवाडी परिसर तसेच कर्जत बाजारपेठेतील रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. विशेषतः पेज नदी पुलावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले असून काही जणांचे प्राण गेले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार या समस्येकडे लक्ष वेधले; मात्र संबंधित ठेकेदारांकडून केवळ नाममात्र डागडुजी करून काम उरकले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सरकारी यंत्रणांच्या निष्क्रियतेला कंटाळून अखेर गणपती उत्सवाच्या काळात ग्रामस्थ व व्यापारी संघटनांनी स्वखर्चाने कशेळे ते वंजारवाडी दरम्यान मुरूम टाकून खड्डे बुजवले. यामुळे काही काळ दिलासा मिळाला; मात्र पावसाळ्यानंतर मुरूम उडून प्रचंड धूळ निर्माण झाली. परिणामी कशेळे बाजारपेठेतील दुकाने व घरे धुळीने माखत असून अनेक नागरिकांना श्वसनविकारांचा त्रास सुरू झाला आहे. सरकारी दवाखान्याजवळील खड्ड्यांमुळे गरोदर महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशाराही दिला होता; तरीही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. अखेर सोमवार, ता. १९ जानेवारी रोजी कशेळे येथील सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील, राजेंद्र हरपूडे, सचिन राणे, दिनेश हरपूडे व विजय शिंदे यांनी थेट मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एमएसआरडीसी कार्यालयात धडक देत उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेतली. महामार्गावरील खड्ड्यांची गंभीर स्थिती मांडल्यानंतर गायकवाड यांनी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच कार्यकारी अभियंता अरुण देवकाते यांनी १५ दिवसांत सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे स्पष्ट केले.
..................
ठेकेदाराचे पलायन
कर्जत-खोपोली मार्गावरील वर्णे, नावंडे व हाल परिसरात रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार निघून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या मार्गावर सातत्याने लहान-मोठे अपघात होत असून हा मार्ग खरंच राष्ट्रीय महामार्ग आहे का?, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. सरकारने तातडीने ठोस कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कशेळेसह संपूर्ण कर्जत तालुक्यातील नागरिकांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

