उल्हासनगरमध्ये निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया
उल्हासनगर, ता. २० (बातमीदार) : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत ७८ नगरसेवक निवडून आले आहेत. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान उल्हासनगरात नियुक्त सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पारदर्शक आणि नियमबद्ध कामकाजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निवडणूक आयोगाकडून उल्हासनगर महापालिकेसाठी पाठविण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांनी कायदा व निवडणूक नियमांचे काटेकोर पालन करत कामकाज केल्याने उमेदवार तसेच राजकीय पक्षांचा विश्वास संपादन केला आहे. विशेष म्हणजे काही अन्य महापालिकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी व नाराजी व्यक्त होत असताना, उल्हासनगरमधील अनुभव मात्र सकारात्मक ठरला आहे. एकूण २० प्रभागांच्या निवडणुकीची जबाबदारी या सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ बाळासाहेब तिडके, क्रमांक २ गणेश सांगळे, क्रमांक ३ विशाल जाधव, क्रमांक ४ विजयकुमार वाकोडे, क्रमांक ५ मुकेश पाटील व क्रमांक ६ संजय शिंदे यांचा समावेश होता.
या सर्व अधिकाऱ्यांनी नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, छाननी करणे, चिन्ह वाटप, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे तसेच मतमोजणी करून निकाल जाहीर करणे ही निवडणूक आयोगाने नेमून दिलेली सर्व कामे कायद्याच्या चौकटीत व पारदर्शकपणे पार पाडली.
प्रशासनाकडूनही प्रशंसा
मुंबई, ठाणे, तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकांतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी झाल्या असतानाच, उल्हासनगरमधील निर्णय अधिकाऱ्यांनी सचोटीने कर्तव्य बजावल्याबद्दल महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, मुख्य निवडणूक निरीक्षक नीलेश गटणे व निवडणूक निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी विशेष प्रशंसा केली आहे. तसेच सर्व सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे उमेदवार व विविध राजकीय पक्षांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. उल्हासनगरची निवडणूक प्रक्रिया राज्यासाठी एक सकारात्मक उदाहरण ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

