ठाकरेंचे शिलेदार ठरवणार महापौर कोणाचा

ठाकरेंचे शिलेदार ठरवणार महापौर कोणाचा

Published on

ठाकरेंचे शिलेदार ठरवणार महापौर कोणाचा
किंवा
केडीएमसीची सत्ता ठरवणार ठाकरे बंधू
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० ः सत्तास्थापनेचा जो तिढा मुंबई महापालिकेत आहे तोच तिढा कल्याण-डोंबिवली महापालिकेतही कायम आहे. महायुतीत लढलेले भाजपा आणि शिंदे गट यांना सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा असला तरी महापौर कोणाचा यावरून दोघांचे घोडे अडलेले आहे. या सत्तासंघर्षात दोघांकडे महापौर पदासाठीचे संख्याबळ पुरेसे नसल्याने सत्तेची चावी थेट ठाकरेंच्या १६ नगरसेवकांच्या हाती गेली आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपने ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे, राहुल भगत, धनंजय बोडारे, मनसेचे प्रकाश भोईर, मनोज घरत, मंदा पाटील, शिंदे गटाचे महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील अशा अनेक दिग्गजांना फोडून एकहाती सत्ता आणण्याचे गणित बांधले होते. तर शिंदे गटाने भाजपाचे विकास म्हात्रे, कविता म्हात्रे, काँग्रेसचे सचिन पोटे, राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, मनसेची कस्तुरी देसाई, गजानन पाटील, राजन मराठे, अपक्ष कुणाल पाटील यांना आपल्या बाजूला वळवण्याच्या शक्यतांवर सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहिले होते. मात्र प्रत्यक्ष निकालाने दोन्ही पक्षांची ही गणिते कोलमडली.
शिंदे गट आणि भाजप महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा करत असले, तरी पडद्याआड मात्र आपल्या पक्षाचाच महापौर व्हावा, यासाठी दोन्ही पक्षांकडून जुळवाजुळवसुरु आहे. सत्तेचा जादुई आकडा गाठणे दोन्ही मित्र पक्षांना स्वतंत्रपणे शक्य नाही. भाजपाचे ५० तर शिंदे गटाचे ५३ नगरसेवक निवडून आले आहेत. पालिकेवर स्वतःचा महापौर बसवायचा असेल, तर भाजपाला १२ आणि शिंदे गटाला ९ नगरसेवकांची अजून गरज आहे. यासाठी गुप्त वाटाघाटी तसेच गरज पडल्यास फोडाफोडीचे राजकारणही सुरू आहे. या सर्व हालचालींच्या केंद्रबिंदू स्थानी ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक आले आहेत.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे ११ तर मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोघे आधीच शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. मात्र, आता ठाकरे बंधू नेमकी कोणती भूमिका घेतात, यावरच महापौरपदाचा फैसला होणार आहे.

कार्यकर्त्यांचे बळ
महापालिका निवडणुकीच्या राज ठाकरेंच्या शाखा भेटी सोडल्या तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभा, दौरे कल्याण-डोंबिवलीत जवळपास झालेच नाहीत. तरीही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर तब्बल ११ जागा जिंकल्या. डोंबिवलीत मात्र त्यांना खाते उघडता आले नाही. परंतु, कल्याण पश्चिमेत सात आणि पूर्वेत चार नगरसेवक निवडून आले आहेत.

फोडाफोडीचे प्रयत्न
एकीकडे जुळवाजुळव, तर दुसरीकडे फोडाफोडीचे प्रयत्न जोर धरू लागले आहेत. अशातच, शिंदे गटाने मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांच्यावर डोळा ठेवला आहे, तर मनसेच्या शीतल मंढारी याही भाजपच्या गोटात जाऊ शकतात, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला महत्व
कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक नगरसेवक निवडून आला आहे. सध्याच्या घडीला या नगरसेवकांकडे दुर्लक्ष होत असले तरी भाजप आणि शिंदे गटात महापौर पदाचा तिढा न सुटल्यास फोडाफोडीच्या राजकारणाला जोर येणार आहे. यावेळी या तीन नगरसेवकांना महत्त्व प्राप्त होऊ शकते. हे तीन नगरसेवक कोणाला पाठिंबा देतात. यावरून देखील सत्तेतील आकडेवारीची गणिते फिरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com