

पालघर-बोईसर रस्त्यावर ठिय्या आंदोलन
पोलिसांकडून अटकाव; पालघरमध्ये लाल वादळ धडकले
पालघर, कासा, ता. २० (बातमीदार) ः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेला चारोटी ते पालघर मोर्चा मंगळवारी सायंकाळी पालघर जिल्हा परिषद कार्यालयाजवळ पोहोचला. मात्र, मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यापासून पोलिसांनी अडविल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. यामुळे संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
शेतकरी, आदिवासी, कामगार आणि ग्रामीण जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता पुन्हा पायी कूच करत मोर्चा पालघरकडे रवाना झाला. २०१८ मध्ये नाशिक ते मुंबई असा ऐतिहासिक ‘लाँग मार्च’ काढण्यात आला होता. त्या वेळी झालेल्या करारानंतरही अनेक मागण्या अमलात न आल्याने पक्षाने सातत्याने आंदोलने केली. २०२३ मध्येही पालघरमध्ये विविध प्रश्नांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, जनतेला अपेक्षित दिलासा मिळालेला नाही, असा आरोप या वेळी करण्यात आला.
वातावरण तणावपूर्ण
दरम्यान, मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यापासून पोलिसांनी अडविल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. पाच मिनिटांत निर्णय घेतला नाही, तर येथेच ठिय्या आंदोलन सुरू करू, असा इशारा ज्येष्ठ नेते अशोक ढवळे आणि आमदार विनोद निकोले यांनी पोलिस व जिल्हा परिषद प्रशासनाला या वेळी दिला. त्यानंतर प्रशासनाने नमते घेत मोर्चेकऱ्यांना जिल्हा परिषद कार्यालयाच्या दिशेने पुढे जाण्याची परवानगी दिली. मात्र, रात्री ७ वाजेपर्यंतही प्रशासनाकडून मोर्चेकऱ्यांसोबत चर्चेसाठी कोणतीही ठोस व्यवस्था केली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यासाठी किंवा थांबण्याची कोणतीही सोय नसल्याने, तसेच कोणताही वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी पुढे न आल्याने अखेर अशोक ढवळे व आमदार विनोद निकले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेकऱ्यांना जिथे अडविण्यात आले होते, तिथे पालघर-बोईसर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. या ठिय्या आंदोलनामुळे पालघर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. प्रशासन व मोर्चेकऱ्यांमध्ये पुढील चर्चा सुरू होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------------------------------------------
रोजगार, पाणी, वरकस जमिनी, रेशन, स्मार्ट मीटर हे प्रश्न सुटले नाहीत, तर रेल रोको किंवा मुंबईकडे मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाईल. हे आंदोलन मध्येच सोडणार नाही.
- अशोक ढवळे, राष्ट्रीय नेते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष.
़़़़़़
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.