उल्हासनगरात शिंदे गटात रस्सीखेच

उल्हासनगरात शिंदे गटात रस्सीखेच

Published on

उल्हासनगरात शिंदे गटात रस्सीखेच
उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : मंत्रालयात काढण्यात आलेल्या सोडतीत उल्हासनगरचे महापौरपद ‘नागरिकांचा मागासवर्ग’ प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सत्ताधारी शिंदे गटात महापौरपदाच्या शर्यतीला वेग आला आहे. महापालिकेतील सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेना (शिंदे गट) आपला महापौर बसवण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे आरक्षण जाहीर होताच पक्षातील इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यंदा महापालिकेच्या २० प्रभागांतील ७८ जागांपैकी २१ जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होत्या. या २१ जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ११ महिला आहेत. त्यामुळे ओबीसी महिला नेतृत्वाला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यानंतर शिंदे गटातून अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांत चुरस पाहायला मिळत आहे. महिलांमध्ये राजश्री चौधरी, इंदिरा पाटील, जोत्सना जाधव, अश्विनी निकम, डिंपल ठाकूर, वंदना भदाणे, तर पुरुषांमध्ये राजेश चांपूर, दिलीप जग्यासी, विकी लबाना हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. या नऊ नावांभोवती सध्या राजकीय चर्चा फिरत असून, वरिष्ठ पातळीवर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विरोधकांची कोंडी
आरक्षण जाहीर झाल्यामुळे विरोधी पक्षांच्या आशा धुसर झाल्या असून, आता खरी लढत शिंदे गटातील अंतर्गत गोटातच होणार आहे. पक्षश्रेष्ठींचा कल कोणाकडे राहतो आणि जातीय समीकरणांसोबतच ‘निष्ठा’ कोणाची फळाला येते, यावर महापौरचा चेहरा अवलंबून असेल. येत्या काही दिवसांत या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com