आंबेपूर (कुर्डुस) मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराची सुरूवात

आंबेपूर (कुर्डुस) मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराची सुरूवात

Published on

आंबेपूर (कुर्डुस) मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात
भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन; तिरंगी महिला लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष
पोयनाड, ता. २४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आंबेपूर (कुर्डुस) जिल्हा परिषद मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) यांच्या रसिका केणी, भाजपच्या चित्रा पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पूजा भगत-गिरी या तीन महिला उमेदवारांमध्ये थेट तिरंगी लढत होत असून, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या प्रचाराचा अधिकृत आरंभ दिवलांग येथील गणपती मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन केला. या वेळी जिल्हा परिषद उमेदवार रसिका केणी, आंबेपूर पंचायत समिती उमेदवार शैलेश पाटील तसेच रुईशेत-भोमोली पंचायत समिती उमेदवार कृष्णा लोभी यांच्या उपस्थितीत प्रचाराची दिशा निश्चित करण्यात आली. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत निवडणूक रणशिंग फुंकले. या प्रचारावेळी पेझारी, ढोलपाडा, बांधण, पोयनाड इत्यादी गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. परिसरात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत वातावरण भारावून टाकले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी सांगितले, की आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण नऊ ग्रामपंचायतींचा समावेश असून, शिवसेना प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपले काम मांडणार आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधा यासाठी शिवसेना नेहमीच लढत राहिली आहे. जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून आगामी काळात या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस भूमिका घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com