टिटवाळा परिसर भूमाफियांच्या विळख्यात

टिटवाळा परिसर भूमाफियांच्या विळख्यात

Published on

बेकायदा बांधकामांचे पेव
टिटवळ्यात तोडलेली बांधकामे पुन्हा उभी
टिटवाळा, ता. २९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ''अ'' प्रभाग क्षेत्रांतर्गत येणाऱ्या टिटवाळा, बल्याणी, मांडा, बनेली आणि लगतच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा बांधकामांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेने कारवाई करून जमीनदोस्त केलेली बांधकामे काही दिवसांतच पुन्हा उभी राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

डोंबिवली पश्चिमेनंतर सर्वाधिक हरितपट्टा लाभलेला परिसर म्हणून टिटवाळ्याची ओळख आहे; मात्र सध्या या परिसरातील मोकळ्या जागा, डोंगररांगा आणि शासकीय भूखंडांवर अनधिकृतपणे चाळी, पत्र्याचे शेड आणि इमारतींची बांधकामे सुरू आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यास भविष्यात या भागात पूरस्थिती किंवा नागरी सुविधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

तत्कालीन महापालिका आयुक्तांनी बेकायदा बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेत एका साहाय्यक आयुक्ताचे निलंबन केले होते. त्यानंतर काही काळ येथील अनधिकृत बांधकामांना लगाम बसला होता. मात्र, सध्या निवडणूक प्रक्रियेत प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा भूमाफियांकडून घेतला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुख्य रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणीही हिरव्या जाळ्यांचे आच्छादन लावून रातोरात स्लॅब टाकण्याचे काम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
स्थानिक नागरिकांच्या मते, ''अ'' प्रभागातील बीट मुकादम आणि निरीक्षक यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी ही बांधकामे लपवून-छपवून, प्रामुख्याने रात्रीच्या वेळी केली जातात. विशेष म्हणजे, काही शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही अशी अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

बेकायदा बांधकामांची तक्रार आल्यास ती तत्काळ तोडली जातात. निवडणूक कामात यंत्रणा व्यस्त असल्याने काहीसा विलंब झाला असू शकतो. संबंधित भागात पथक पाठवून तातडीने कारवाई करण्यात येईल.
- जयवंत चौधरी, साहाय्यक आयुक्त, ''अ'' प्रभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com