झुंझार पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत पोयनाड पोलीस संघ विजयी
क्रिकेट स्पर्धेत पोयनाड पोलिस संघ विजयी
पोयनाड, दि. २९ (बातमीदार) : झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या वतीने झुंझारच्या क्रीडांगणावर नुकतेच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पोयनाडच्या तलाठी कार्यालयाचे माजी मंडळ अधिकारी महेश निकम व पोयनाड पोलिस स्टेशनचे एपीआय विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पोयनाड पोलिस संघ विजयी झाला आहे.
या स्पर्धेत पोयनाड विभागातील पोलिसांच्या संघासह, व्यापारी असोसिएशन संघ, महावितरण कंपनीचा संघ व झुंझार वॉरियर्स अशा चार संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार खेळविण्यात आली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोलिसांच्या संघाने व्यापारी असोसिएशन संघाचा १८ धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी होण्याचा मान मिळवला आहे. अंतिम सामन्यात पोलिस स्टेशनचे एपीआय विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पोलिसांच्या संघाने प्रथम फलंदाजी करतांना सहा षटकांच्या समाप्तीच्या नंतर आठ गडी गमावत ४८ धावा काढल्या, व्यापारी असोसिएशनच्या संघाने सहा षटकात ७ गडी गमावत ३० धावा केल्या.
स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यापारी असोसिएशनच्या प्रीत जैन याला मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज पोलिस संघाचे वितेश कवळे तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अमोल घरत यांना चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरणासाठी झुंझारचे सचिव किशोर तावडे, खजिनदार दिपक साळवी, क्रीडा प्रमुख नंदकिशोर चवरकर, सदस्य अजय टेमकर सुजित साळवी, व्यापारी असोसिएशनचे सदस्य किशोर जैन, प्रदिप जैन, ऋषिकुमार जैन, आर. डी. जैन, अक्षय अग्रवाल, विश्वकुमार नाईक, शैलेंद्र गायकवाड, ॲड. पंकज पंडित यांच्यासह व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र :
पोयनाड : झुंझार पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत पोयनाड पोलीस संघ अंतिम विजेता ठरला.

